Wednesday, October 28, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत पाण्याचा प्रश्न चिघळला; सर्वपक्षीय रणशिंग फुंकले

भद्रावतीत पाण्याचा प्रश्न चिघळला; सर्वपक्षीय रणशिंग फुंकले

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, टँकरवर वाढती अवलंबित्व आणि दिवसेंदिवस तीव्र होत जाणारी समस्या यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने आता सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत पाणीटंचाईविरोधात थेट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

निवेदनानुसार, दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता नगर परिषद कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, प्रशासनाला थेट जाब विचारला जाणार आहे.

निवेदनात प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे की, शहरातील पाणीटंचाई तात्काळ दूर करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

सध्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाई इतकी भीषण झाली आहे की, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक ताणही वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आता सर्वपक्षीय मोर्च्यामुळे हा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला असून, नगर परिषद प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, यावर पुढील परिस्थिती ठरणार आहे. नागरिकांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

“पाणी द्या, नाहीतर रस्त्यावर उतरू”
भद्रावतीत संतप्त नागरिकांचा इशारा

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!