Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरभद्रावती तहसील कार्यालयाचा कारभार वादात; तक्रारींचा भडिमार, तरीही कारवाई शून्य

भद्रावती तहसील कार्यालयाचा कारभार वादात; तक्रारींचा भडिमार, तरीही कारवाई शून्य

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55

भद्रावती तहसील कार्यालयातील कामकाजाविरोधात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र दिसत आहे. विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

हक्कुपत्रक, जमीन नोंदी, विविध प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. काही प्रकरणांमध्ये अर्ज प्रलंबित ठेवले जात असून, नागरिकांना महिनोन्‌महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढासळल्याची चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लेखी निवेदने देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रसारमाध्यमांतूनही या प्रकारांना वाचा फोडण्यात आली. मात्र, एवढ्या तक्रारी आणि उघडकीनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा दिसून आलेली नाही.

दरम्यान, प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच तहसीलदारांच्या कार्यप्रणालीविरोधात निवेदन सादर केले आहे. अंतर्गत पातळीवर नाराजी व्यक्त होत असल्याने कार्यालयातील समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत.

याचदरम्यान, भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनीही या प्रकरणात निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नागरिक, कर्मचारी आणि राजकीय पदाधिकारी  सर्व स्तरातून तक्रारी होत असतानाही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

भद्रावती तहसील कार्यालयाशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकार यापूर्वीही समोर आले असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना अधिकच बळावली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा, चंद्रपूर तालुका अध्यक्ष संतोष उर्फ पवन शिवणकर यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून, वरिष्ठ प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढत आहे.

सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, इतक्या तक्रारी, निवेदने आणि उघड झालेल्या प्रकारांनंतरही कारवाई का होत नाही? संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार का, की प्रकरण दाबून टाकले जाणार, अशी चर्चा सुरू आहे.

ही संपूर्ण बाब वरिष्ठ प्रशासनाच्या निदर्शनास आली असतानाही परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढत आहे. त्यामुळे लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तक्रारींचा पाऊस, कर्मचाऱ्यांची नाराजी, राजकीय निवेदने… सर्व काही समोर पण कारवाई नाही; भद्रावती तहसील कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे प्रश्नचिन्हाखाली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!