महागडी पुस्तके, वाढीव फीवरून संताप; प्रशासनाला धडक इशारा, चौकशीची ठाम मागणी
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती येथील सेंट अॅनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर नगरसेवक अनिल श्यामराव पडोळे आक्रमक भूमिकेत समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडणे, ठराविक दुकानातूनच खरेदीची सक्ती करणे आणि मासिक फीमध्ये मनमानी वाढ करणे या प्रकारांविरोधात त्यांनी थेट प्रशासनाला धडक देत पंचायत समिती भद्रावतीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शाळेकडून पालकांवर ठराविक विक्रेत्याकडूनच पुस्तके खरेदी करण्याचा दबाव टाकला जात आहे. या पुस्तकांच्या किंमती बाजारभावापेक्षा अधिक असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांसाठी ३२०० ते ३७०० रुपयांपर्यंत खर्च होत असल्याची माहिती समोर आली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हा मोठा ताण ठरत आहे.
याशिवाय, शाळेकडून पालकांना वैयक्तिक संदेश पाठवून पुस्तक खरेदीसाठी सक्ती केली जात असल्याचेही उघड झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार शाळांना अशा प्रकारे पुस्तके विक्री किंवा सक्ती करण्यास मनाई असतानाही संबंधित शाळेकडून नियमांना सर्रास बगल दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मासिक फीमध्येही कोणतीही पारदर्शकता न ठेवता वाढ करण्यात येत असल्याने पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनिल पडोळे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पालकांचे आर्थिक हक्क लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली लूट खपवून घेतली जाणार नाही. पालकांवर अन्याय होऊ देणार नाही; गरज पडल्यास आंदोलनाचा मार्गही अवलंबू,” असा इशारा अनिल पडोळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण भद्रावती तालुक्याचे लक्ष लागले आहे.


