चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55
काही अधिकारी येतात, काम करतात आणि निघून जातात… पण काही जण आपल्या कार्यशैलीने, धाडसाने आणि माणुसकीने जनमानसात अढळ स्थान निर्माण करतात. चंद्रपूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे असेच एक व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांच्या कार्यकाळाने केवळ कायदा व सुव्यवस्थाच नव्हे, तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला.
राज्य शासनाच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या बदली आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आयुष नोपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच पदभार स्वीकारणार असून सुदर्शन मुम्मका यांची बदली अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने ठोस पावले उचलण्यात आली. अवैध धंद्यांवर नियंत्रण, गुन्हेगारी प्रवृत्तीवर कारवाई आणि पोलीस-जनता संवाद वाढवणे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे पोलीस यंत्रणा अधिक सजग आणि जबाबदार बनली.
तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे, स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण करणे आणि प्रशासनाला अधिक पारदर्शक बनवणे या बाबींमध्ये त्यांचे काम उल्लेखनीय ठरले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस यंत्रणेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले आयुष नोपाणी हे यापूर्वी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिस्तबद्ध आणि परिणामकारक कामगिरी केली असून त्यांच्या नेतृत्वाकडून चंद्रपूर जिल्ह्याला अधिक सक्षम पोलीस प्रशासन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना आवाहन…!
कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.
अवैध धंद्यांपासून दूर राहावे,:संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, समाजात शांतता आणि सौहार्द राखावे, तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे
सुरक्षित आणि निरोगी चंद्रपूर घडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.


