शिक्षण की दुकानदारी?
तक्रारीनंतर शाळेजवळच ‘आमचंच दुकान’; भद्रावतीत सेंट अॅॅनीस स्कूलचा नवा कारनामा चर्चेत
“पुस्तकं घ्या… फी भरा… आणि प्रश्न विचारलात तर इंग्रजी ऐका!” पालकांचा संताप
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55
भद्रावतीतील सेंट अॅॅनीस स्कूल सुमठाना शाळेचा कारभार सध्या शिक्षणापेक्षा “व्यवसाय मॉडेल” म्हणूनच जास्त चर्चेत आला आहे. आधी महागडी पुस्तके, त्यानंतर वाढीव फी, मग ठराविक दुकानातूनच खरेदीची सक्ती… आणि आता तर चक्क तक्रार झाल्यानंतर शाळेजवळच नवीन दुकान उघडल्याने पालकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे.
नगरसेवक अनिल श्यामराव पडोळे यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवत पंचायत समितीकडे तक्रार दिल्यानंतर प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला बोलावून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण घेतले. मात्र त्यानंतर कारवाई होण्याऐवजी जणू काही “नवीन आयडिया”च जन्माला आली.
पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळेपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर नवीन पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आले असून, काही कर्मचारी उघडपणे “ते आमचंच दुकान आहे” असे सांगत आहेत. त्यामुळे “शाळा चालते की पुस्तक मॉल?” असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल ३२०० ते ३७०० रुपयांची पुस्तकं घ्यावी लागत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. विशेष म्हणजे, पुस्तकांच्या किंमती पाहून काही पालकांना वाटलं की मुलगा शाळेत जातोय की थेट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतोय!
याचबरोबर फी वाढीचाही मुद्दा तापला असून, “फी किती वाढली?” याचं उत्तर पालकांना मिळत नाही, पण “भरायची कधी?” याचा मेसेज मात्र वेळेवर पोहोचतो, अशी उपरोधिक चर्चा शहरात रंगली आहे.
दरम्यान, नगरसेवक अनिल पडोळे यांनी संबंधित प्राचार्यांना या प्रकाराबाबत विचारणा केली असता, त्यांनी इंग्रजीत उत्तर दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतप्त पालक आता म्हणू लागले आहेत “आम्ही फी मराठीत भरतो… पण उत्तर इंग्रजीत मिळतं!”
या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात नेमकं शिक्षण सुरू आहे की आर्थिक प्रयोग, असा सवाल उपस्थित होत आहे. पालकांच्या मते, “शाळेचा अभ्यासक्रम कमी आणि पैशांचा अभ्यास जास्त” सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे.
नगरसेवक अनिल पडोळे यांनी प्रशासनाला थेट इशारा देत म्हटले की, “शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट सुरू असेल तर गप्प बसणार नाही. चौकशी करा, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे.”
भद्रावतीत आता एकच चर्चा रंगली आहे
“शाळा आहे की सुपरमार्केट?”
पुढील भागात आणखी धक्कादायक खुलासे…
पुस्तकांच्या दुकानामागील नेमकं गणित काय?
पालकांवर दबाव कोणाचा?
आणि शिक्षणाच्या नावाखाली नेमका कोणाचा फायदा?
वाचा पुढील भाग लवकरच…!


