Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरशाळांना सुटी लागताच काही व्यावसायिकांचा “आनंदोत्सव”; चिमुकल्यांच्या शोधासाठी जणू गुप्त मोहीमच सुरू?

शाळांना सुटी लागताच काही व्यावसायिकांचा “आनंदोत्सव”; चिमुकल्यांच्या शोधासाठी जणू गुप्त मोहीमच सुरू?

“शाळा बंद… आणि काही ठिकाणी ‘बालकामगार भरती अभियान’ सुरू असल्याची उपरोधिक चर्चा!”

चहा टपरीपासून गॅरेजपर्यंत एकच चर्चा “कामाला मुलगा पाहिजे… अनुभव नसला तरी चालेल!”

चंद्रपूर, न्यूज डेस्क✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55

उन्हाळी सुट्टी सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्यात काही व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर अचानक आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याची उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे. कारण शाळा बंद होताच काही हॉटेल, टपऱ्या, गॅरेज, ढाबे, वर्कशॉप आणि दुकानांमध्ये “स्वस्त आणि आज्ञाधारक कामगार” उपलब्ध होण्याचा हंगाम सुरू झाल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.

ज्या वयात मुलांच्या हातात क्रिकेट बॅट, वही-पुस्तकं आणि खेळणी असायला हवी होती, त्या वयात अनेक चिमुकल्यांच्या हातात आता चहाचे ग्लास, झाडू, भांडी आणि ग्रीस लागलेली साधनं दिसत असल्याचे वास्तव नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी तर एवढी हास्यास्पद परिस्थिती दिसून येते की, दुकानातील मुलगा ग्राहकापेक्षा लहान… पण काम मात्र मोठ्यांसारखं!

“अरे छोटू… दोन कटिंग मार!”,
“ए बाळा… टेबल पुस!”,
“त्या ग्राहकाला पाणी दे!”

अशा आदेशांनी अनेक चिमुकल्यांचा दिवस सुरू होत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी “बालकामगार ठेवणे गुन्हा आहे” असे मोठमोठे बोर्ड दुकानाबाहेर झळकत असतात; मात्र त्याच बोर्डाखाली अल्पवयीन मुलं धावताना दिसल्याने नागरिकांनीही उपरोधिक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
“फलक कायद्याचा… आणि आत व्यवहार वेगळाच!” अशी कुजबुज आता उघडपणे ऐकू येऊ लागली आहे.

काही व्यावसायिकांकडून “काम शिकतोय”, “गरीब घरचं पोरगं आहे”, “मदतीला आलंय” असे गोंडस डायलॉग मारले जात असल्याची चर्चा आहे. मात्र दिवसभर काम, ओरडा आणि थकवा यामध्ये त्या मुलांचं बालपण हरवत असल्याची गंभीर बाब दुर्लक्षित होत आहे.

दरम्यान, काही ठिकाणी तर जणू “सुट्टी स्पेशल ऑफर” सुरू असल्यासारखी स्थिती असल्याचे नागरिक उपरोधाने सांगतात.
“मोठा कामगार ठेवला तर पगार द्यावा लागतो… छोटू ठेवला तर फक्त ओरडून काम होतं!”
अशी मानसिकता काही ठिकाणी अजूनही जिवंत असल्याचे बोलले जात आहे.

गरीबी आणि आर्थिक अडचणीमुळे काही पालकही हतबल आहेत. “चार पैसे मिळतील” या आशेने मुलांना कामावर पाठवलं जात असलं, तरी त्यांची शाळा, शिक्षण आणि भविष्य हळूहळू अंधारात जात असल्याची खंत व्यक्त होत आहे.

प्रशासनाची धाड फक्त फोटोपुरती?

बालकामगारांविरोधात अधूनमधून मोहीम राबवली जाते, फोटो काढले जातात, बैठका घेतल्या जातात; पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परिस्थिती “जैसे थे” असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांनी तर उपरोधिक टोला लगावला आहे की,

“धाड येते तेव्हा छोटू मागच्या दरवाजातून गायब… आणि अधिकारी गेले की पुन्हा हजर!”

यामुळे कारवाई फक्त कागदावर आणि फलकांवरच मर्यादित असल्याची चर्चा रंगत आहे.

समाजालाही विचार करावा लागेल!
बालकामगार ही केवळ गरीबांची समस्या नसून समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे. कारण जेव्हा एखादा ग्राहक चहा घेऊन शांत बसतो, तेव्हा त्याच्या समोर उभा असलेला “छोटू” शाळेत असायला हवा होता, हा विचार कितीजण करतात?

प्रशासनाने काय करावे?

हॉटेल, गॅरेज, ढाबे आणि दुकानांवर अचानक तपासणी करावी
“मदतीला आहे” या डायलॉगमागचं सत्य तपासावं
बालकामगार ठेवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी
गरीब कुटुंबांना आर्थिक मदत आणि मुलांना शिक्षणाची हमी द्यावी
प्रत्येक तालुक्यात विशेष बालसंरक्षण मोहीम राबवावी
“बालकामगार विरोधी फलक लावून उपयोग नाही…
जर त्याच फलकाखाली छोटू चहा देताना दिसत असेल, तर समाजाने आरशात पाहण्याची वेळ आली आहे!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!