सिंदेवाहीत दारूचा “होम डिलिव्हरी” माहोल; State Excise Department मात्र गाढ झोपेत?
वडा-समोसा खा… आणि सोबत देशी दारू फ्रीत घ्या? सिंदेवाहीत अवैध विक्रीचा भन्नाट प्रकार!
सिंदेवाही, तालुका प्रतिनिधी
✍️ॲड. नंदकुमार गंडाटे
सिंदेवाही तालुक्यात अवैध देशी दारू विक्रेत्यांनी अक्षरशः “सेवा हाच धर्म” मोहीम सुरू केली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिद्धार्थ चौक ते बाजार चौक परिसरात देशी दारू इतक्या खुलेआम विकल्या जात आहे की, आता फक्त रेटलिस्ट आणि ऑफर बोर्ड लावायचे बाकी असल्याची उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
विशेष म्हणजे, सिंदेवाही रेल्वे स्टेशन परिसरातील काही नाश्त्याच्या दुकानांमध्ये वडा-समोसा सोबत “देशी स्पेशल” मिळत असल्याची जोरदार चर्चा असून, “नाश्ता करा आणि मूड फ्रेश करा” अशीच काहीशी परिस्थिती तयार झाली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराकडे State Excise Department चे मात्र आश्चर्यकारक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत अवैध विक्री सुरू असताना संबंधित विभागाला काहीच दिसत नसल्याने, “विभागाकडे दुर्बीण आहे की डोळ्यावर पट्टी?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
कारवाईच्या नावाखाली कधीतरी एखादा फोटो, एखादा पंचनामा आणि दोन रिकाम्या बाटल्या जप्त करून “मोठी मोहीम” झाल्याचे दाखवले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा तोच धंदा जोमात सुरू होत असल्याने, ही कारवाई नेमकी अवैध विक्रेत्यांवर होते की फक्त कागदांवरच, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्रेत्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की, आता तेच कदाचित State Excise Department ला “काम कसं करायचं” याचे प्रशिक्षण देतील की काय, अशी उपहासात्मक चर्चा रंगू लागली आहे.
आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “झोपेचे सोंग” सोडून सिंदेवाहीतील अवैध देशी दारू विक्रीवर धडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.


