Wednesday, October 28, 2026
Homeचंद्रपूरवरोरा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेती वाटप योजनेचा शुभारंभ

वरोरा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेती वाटप योजनेचा शुभारंभ

आमदार करण देवतळे यांच्या हस्ते प्रारंभ; २८०० लाभार्थ्यांना मोठा दिलासा

वरोरा, न्यूज डेस्क ✍️

ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप उपक्रमाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. वरोरा तालुक्यातील करंजी रेती घाटावर आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमामुळे तालुक्यातील सुमारे २८०० घरकुल लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून, घरबांधणीसाठी लागणाऱ्या रेतीच्या वाढत्या खर्चातून मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक रखडलेली घरकुल कामे आता गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी बोलताना आमदार करणदादा देवतळे म्हणाले की, “गरजू नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. मोफत रेती वाटपामुळे लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन घरकुलांची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल.”

कार्यक्रमात तहसीलदार योगेश कौटकर यांनी प्रास्ताविकातून माहिती देताना सांगितले की, लाभार्थ्यांना करंजी, तुळाना क्रमांक १, तुळाना क्रमांक २, पवनी-येवती, पवनी व केळी या सहा घाटांवरून प्रती लाभार्थी पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रसंगी नगराध्यक्षा अर्चनाताई आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी भस्के साहेब, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी मुंडकर साहेब यांच्यासह बाजार समिती संचालक बाळू भोयर, देविदासजी ताजने, सुजितजी कष्टी, प्रभाकरजी कष्टी, निलेशजी मिलमिले, रामदासजी गाडगे, गजानन मेश्राम, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

रेतीच्या वाढत्या किमतींमुळे अनेक लाभार्थ्यांना घरबांधणी पूर्ण करणे कठीण जात होते. अशा परिस्थितीत शासनाने थेट घाटावरून मोफत रेती उपलब्ध करून दिल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. शासनाचा हा लोकहितकारी निर्णय सर्वसामान्य कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!