Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत चंद्रपूरचा सुवर्ण धडाका; पाच खेळाडूंची मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत चंद्रपूरचा सुवर्ण धडाका; पाच खेळाडूंची मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत चंद्रपूरचा सुवर्ण धडाका; पाच खेळाडूंची मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आयुषी स्पोर्ट्स अकादमी व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशनची ऐतिहासिक कामगिरी; विदर्भाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकला

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️

प्राचीन भारतीय पारंपरिक शस्त्रकला आणि शिवकालीन युद्धकौशल्याचा वारसा जपणाऱ्या सिलंबम या क्रीडाप्रकारात चंद्रपूर जिल्ह्याने अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा सिद्ध केला आहे. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर यांच्या अथक परिश्रमांना मोठे यश मिळाले असून, विदर्भाच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल पाच खेळाडूंची ऑगस्ट २०२६ मध्ये मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशिया संलग्न सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये चंद्रपूरच्या खेळाडूंनी अक्षरशः सुवर्ण पदकांची लयलूट करत प्रतिस्पर्ध्यांना चक्रावून सोडले.

या स्पर्धेत आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर व आयुध स्पोर्ट्स अकादमी, भद्रावतीच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत चमकदार यश मिळवले.
दीक्षांत दुर्गराज रामटेके यांनी ३ सुवर्ण व १ रौप्य पदक, दीक्षांत महेंद्र सोनारकर यांनी तब्बल ४ सुवर्ण पदके, हर्ष राजुरकर यांनी ३ सुवर्ण पदके, मित राजुरकर यांनी १ सुवर्ण व २ रौप्य पदके, तर अर्णव बाबा कोटनाके यांनी १ सुवर्ण व २ कांस्य पदके पटकावत चंद्रपूर जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला.

सिंगल लाठी रोटेशन, लाठी-काठी फायट, तलवार रोटेशन, सुरुल रोटेशन आणि एम्प्टी हॅण्ड काता यांसारख्या कठीण प्रकारांत या खेळाडूंनी आपल्या वेग, तंत्र, आत्मविश्वास आणि कौशल्याचे दमदार प्रदर्शन सादर केले. उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात “वाह रे चंद्रपूर!” अशी उत्स्फूर्त दाद दिली.

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात सिलंबम या पारंपरिक भारतीय शस्त्रकलेचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन करीत आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला मैदानाकडे वळवत शिस्त, आत्मसंयम आणि परिश्रमाचे संस्कार रुजविण्याचे काम या संस्थेमार्फत होत आहे.

या ऐतिहासिक यशामागे विदर्भ विभाग प्रमुख व सिलंबम प्रशिक्षक मास्टर दुर्गराज एन. रामटेके यांचे कठोर प्रशिक्षण, नियोजन आणि समर्पण मोलाचे ठरले. त्यांच्या पुढाकारातून १९ एप्रिल २०२६ रोजी अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथे विदर्भस्तरीय सिलंबम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशियाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक संजय बनसोडे यांनी खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केले होते.

खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, पालक, संघटनांचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांना दिले आहे. विशेषतः संस्थापक व अध्यक्षा शीतल रामटेके, सचिव बी. एल. करमनकर, टीम मॅनेजर अशोक कामडे, तसेच करण डोंगरे, संजय माटे, राकेश राय, आयुषी रामटेके यांच्यासह सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक होत आहे.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाभरातून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता सर्वांच्या नजरा मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपकडे लागल्या असून, “आता जागतिक स्तरावरही चंद्रपूरचा डंका वाजणार!” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!