भद्रावती पोलिसांची आक्रमक मोहीम; दोन मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा..!
तलवारीसह युवक जेरबंद; दुचाकीचोरांनाही ठोकल्या बेड्या..!
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक पवित्रा घेत सलग दोन धडाकेबाज कारवाया करत आरोपींना गजाआड केले आहे. एका कारवाईत सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या काही दिवसांत शोध लावत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवायांमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळा तलाव, किल्ला वॉर्ड परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली. या वेळी ऋतिक संतोष रामटेके (वय २६, रा. आंबेडकर चौक, भद्रावती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ५ हजार रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत भद्रावती येथून चोरीस गेलेल्या Hero HF Deluxe दुचाकी प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय कमी कालावधीत छडा लावला. फिर्यादी प्रफुल पांडुरंग निगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि यमल तंगराज कोरवन (वय ४०) व गोपाल जिवन मालाकार (वय ३०, दोघेही रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांना अटक केली. आरोपींकडून चोरीची दुचाकी व इतर साहित्य असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही उल्लेखनीय कारवाया पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन दुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आष्टणकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे आणि संतोष राठोड यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
भद्रावती पोलिसांच्या सलग यशस्वी कारवायांमुळे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत या कारवायांचे स्वागत केले आहे.


