Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूर“रेती नाही म्हणणाऱ्यांसाठी विशेष चष्मा मागवण्याची मागणी!”

“रेती नाही म्हणणाऱ्यांसाठी विशेष चष्मा मागवण्याची मागणी!”

 भद्रावती तालुक्यात “अदृश्य रेती”चा चमत्कार! 

घाट बंद… रेती गायब… पण ट्रॅक्टर मात्र फुल्ल भरून धावतायत!

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात सध्या एक अनोखा आणि हास्यास्पद प्रकार चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांमध्ये मोठी खसखस पिकली आहे. बंद असलेल्या जेना घाटातून दिवसा ढवळ्या रेती वाहतूक सुरू असल्याची चर्चा गावोगावी रंगली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार इतक्या “व्यवस्थित” पद्धतीने सुरू आहे की, आता लोकांनी याला “अदृश्य रेती मिशन” असे नाव दिले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पहाटेपासून रात्रीपर्यंत काही ट्रॅक्टर बेलोरा मार्गे धडधडत जाताना दिसतात. ट्रॅक्टरच्या ट्रॉली पूर्ण भरलेल्या असतात, धूळ उडत असते, रस्ते खराब होत आहेत; पण अधिकृत माहिती विचारली असता एकच उत्तर मिळते 
 “घाटात रेतीच नाही!”

यामुळे आता नागरिक संभ्रमात पडले आहेत…
रेती नाही तर ट्रॉलीत काय आहे?
ढग भरून नेत आहेत का?
की ट्रॅक्टर आता हवाच वाहून नेत आहेत? 

एका जागरूक नागरिकाने संबंधित विभागातील अधिकाऱ्याला फोन करून माहिती दिली 
📞 “साहेब, जेना घाटातून रेती जात आहे.”

त्यावर अधिकाऱ्यांचे उत्तर आले 
 “अहो, त्या घाटात रेतीच नाही!”

नागरिक काही वेळ शांत राहिला… मग म्हणाला 
“बरं साहेब… मग बेलोरा रोडवरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बहुतेक ‘साखर’ भरलेली असावी… कारण धूळ तर रेतीसारखीच उडतेय!” 

या संपूर्ण प्रकारात “गज्या” नावाचा एक काल्पनिक रेतीसम्राट गावात चर्चेचा विषय बनला आहे. लोक सांगतात की गज्या इतका निडर झाला आहे की, ट्रॅक्टरचा हॉर्नही आता “सरकारी परवानगी” सारखा वाजतो! 

दरम्यान काही गावकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत 

 “घाट बंद आहे, पण रेतीला बहुतेक VIP पास मिळाला असावा!”

 “अधिकाऱ्यांना रेती दिसत नाही… कदाचित ती ‘डिजिटल रेती’ असेल!”

 “ट्रॅक्टर रिकामे असतील तर मग रस्ते खड्डेमय कसे होतायत?”

सध्या तरी या “अदृश्य रेती प्रकरणा” मुळे भद्रावती तालुक्यात चांगलीच हास्यलहर पसरली असून चहाच्या टपऱ्यांपासून चौकापर्यंत फक्त “गज्या आणि अदृश्य रेती” चीच चर्चा रंगताना दिसत आहे! 

 टीप : वरील वृत्त पूर्णतः हास्यव्यंग शैलीत लिहिलेले असून यात उल्लेख केलेली नावे व घटना काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

 पुढील भाग लवकरच…
“गज्याची गुप्त रेती अकादमी”, “अदृश्य ट्रॅक्टरचे रहस्य” आणि “रेती शोध मोहिमेवर निघालेले अधिकारी!” 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!