सिंदेवाहीत जुगाराचा “महाडाव” फसला; पोलिसांच्या एन्ट्रीने पत्तेच झाले जप्त!
“तीन पत्ती”च्या नादात बसलेले १२ जण पोलिसांच्या जाळ्यात; १३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
सिंदेवाही न्यूज डेस्क ✍️
ॲड. देवानंद गंडाटे
सिंदेवाही तालुक्यातील सिव्हनी बुजुर्ग येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकत “आज मोठा हात लागणार” या आशेवर बसलेल्या जुगारवाल्यांचा पूर्ण डावच उलथवून टाकला. पत्त्यांवर नशीब आजमावणाऱ्या मंडळींना पोलिसांनी असा झटका दिला की, थेट १३ लाख ३५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात गेला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. जुगाराच्या रंगात इतके रंगलेले आरोपी पोलिसांना पाहताच काहींची “रंगत” उतरली, तर काहींनी “आम्ही फक्त बघत होतो” असा चेहरा केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही संधी न देता थेट कारवाई करत सर्वांचा “गेम” केला.
या कारवाईत सुनील पांडुरंग ताडाम, विजय भास्कर गहाणे, सुधाकर शंकर बावने, अमित शंकर चौधरी, फरार आरोपी प्रमोद कृष्णा बोरेकर, शेखर मारोती अलोने, गोलू ईश्वर शेंडे, सुरज विष्णू खोब्रागडे, प्रफुल महादेव अलोने, अनिल सुखदेव आत्राम तसेच विजय प्रकाश शेंद्रे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल, तसेच दुचाकी वाहने जप्त केली. “जुगारातून लाखपती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आता कोर्टाच्या तारखा मोजाव्या लागणार,” अशी उपरोधिक चर्चा परिसरात सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे याचे नेतृत्वात, पोलीस अंमलदार रामदास निलेवार , सहाय्यक फौजदार योगराज देशमुख तसेच पोलीस पथकाने केली.
दरम्यान, “जुगाराच्या पत्त्यांवर भविष्य लिहिणाऱ्यांना आता पोलिसांच्या डायरीत नाव पाहावं लागेल,” असा रोखठोक इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.


