Sunday, July 5, 2026
Homeचंद्रपूरप्रसारमाध्यमांच्या बातम्यांकडे दुर्लक्ष? रामपूर वाचनालय प्रकरणात कारवाईचा अभाव

प्रसारमाध्यमांच्या बातम्यांकडे दुर्लक्ष? रामपूर वाचनालय प्रकरणात कारवाईचा अभाव

रामपूर वाचनालय बांधकाम प्रकरण :- प्रसारमाध्यमांतून वारंवार वृत्तप्रसिद्धी, तरीही कारवाईचा ठोस निर्णय नाही

दीड कोटींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; चौकशी आणि जबाबदारी निश्चितीची ग्रामस्थांची मागणी

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
प्रा. अनंत डोंगे
राजुरा तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
मो. 9765233516

राजुरा :- तालुक्यातील रामपूर गावात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या वाचनालय इमारतीच्या बांधकामासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाचनालय इमारतीच्या बांधकामात तांत्रिक निकषांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही कॉलम सरळ रेषेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचाही आरोप होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, बांधकामात मातीमिश्रित रेतीचा वापर होत असल्यास भविष्यात इमारतीच्या स्लॅब, भिंती व इतर संरचनांच्या टिकाऊपणावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत सातत्याने तक्रारी आणि प्रश्न उपस्थित होत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र मौन बाळगत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, या कथित अनियमिततेबाबत विविध प्रसारमाध्यमांमधून अनेकदा वृत्तप्रसिद्धी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकृत चौकशी अहवाल, तांत्रिक निरीक्षणाचा निष्कर्ष किंवा कारवाईबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाचनालय ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीचे, वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाचे आणि सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वाचे केंद्र मानली जाते. अशा प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, बांधकामाची गुणवत्ता तपासण्यात यावी आणि चौकशीत आढळलेल्या बाबींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे .. प्रसारमाध्यमांतून वारंवार मुद्दे समोर येत असताना संबंधित यंत्रणा चौकशी करणार की मौनच कायम ठेवणार?

रामपूर वाचनालय प्रकरणातील कागदोपत्री नोंदी, तांत्रिक बाबी, अंदाजपत्रकातील मुद्दे आणि स्थानिकांनी उपस्थित केलेल्या इतर गंभीर प्रश्नांचा उलगडा… पुढील भागात लवकरच!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!