Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरसिंदेवाहीतील समस्यांकडे दुर्लक्ष नको! ज्येष्ठ नागरिकांनी मांडले ठाणेदारांसमोर वास्तव

सिंदेवाहीतील समस्यांकडे दुर्लक्ष नको! ज्येष्ठ नागरिकांनी मांडले ठाणेदारांसमोर वास्तव

मोकाट जनावरे, सुसाट बाईकस्वार अन् वाहतूक कोंडी; सिंदेवाहीच्या समस्यांवर ठाणेदार वाढवे मॅडम यांच्याशी चर्चा!

कलाम शेख , सिंदेवाही न्यूज डेस्क ✍️

सिंदेवाही शहरात मोकाट जनावरांचा त्रास, सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी, रस्त्यावर उभे राहणारे ट्रक आणि वाहतुकीचे प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाने नूतन ठाणेदार सौ. लताताई वाढवे मॅडम यांची भेट घेऊन विविध मुद्दे थेट मांडले. आता केवळ चर्चा नको, तर समस्यांवर प्रत्यक्ष कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष दादाजी नागदेवते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे भेट देऊन पोलीस निरीक्षक सौ. लताताई वाढवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहरातील सार्वजनिक समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रस्त्यावर ट्रक, शहरात सुसाट बाईक; नियंत्रण आणणार कोण?

सिंदेवाही शहरात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. दुसरीकडे, सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. मोकाट जनावरांचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आणि प्रभावी पोलीस पेट्रोलिंग करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सायंकाळच्या वेळी एसटी बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, असे मुद्देही यावेळी मांडण्यात आले.

ठाणेदारांचे आश्वासन; आता प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा!

ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या समस्या पोलीस निरीक्षक सौ. लताताई वाढवे यांनी ऐकून घेतल्या. सार्वजनिक समस्यांच्या निराकरणासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला.

मात्र, शहरातील समस्या चर्चेपुरत्या मर्यादित न राहता त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना होणे गरजेचे आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण, सुसाट दुचाकीस्वारांवर कारवाई आणि नियमित पोलीस पेट्रोलिंग यांसारख्या उपाययोजनांमुळेच नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे नूतन ठाणेदारांच्या पुढाकाराकडे आता सिंदेवाहीकरांचे लक्ष लागले आहे.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दादाजी नागदेवते, सचिव पवार, कोषाध्यक्ष विश्वनाथजी श्रीरामे, कार्यकारी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या सिंदेवाही तालुका शाखेचे सल्लागार सोमेश्वर पाकवार, कार्यकारी सदस्य अशोकजी तुम्मे, बाबुराव बोरकर, नकटूजी सोनुले, वामनराव सगळाम, कंठीवार सर, बांगडे, रामटेके, जयदेव श्रीरामे, भालतडक आणि मेश्राम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!