Sunday, July 5, 2026
Homeचंद्रपूर२८ कोटींची योजना, तरी नळ कोरडे; नगरसेवकांचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात

२८ कोटींची योजना, तरी नळ कोरडे; नगरसेवकांचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात

२८ कोटींची योजना, तरी नळ कोरडे; नगरसेवकांचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात

तहानलेल्या शहराला वाऱ्यावर सोडून नगरसेवकांची वारी…?

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
प्रा. महेश पानसे

मूल शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील अनेक भागांत नळ कोरडे पडले आहेत. गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबे पाण्यासाठी भटकंती करीत असताना नगरपरिषदेतील काही नगरसेवक व नगरसेविका धार्मिक व पर्यटन दौऱ्यावर गेल्याची चर्चा शहरात रंगू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१२ जूनपासून अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना लोकप्रतिनिधी शहराबाहेर असल्याची चर्चा सोशल मीडियासह विविध स्तरांवर सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी किती संवेदनशील आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा यांनी शहरात पाणीटंचाई भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास नागरिकांना दिला होता. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसून येत आहे. शहरातील सुमारे ३५ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मूल शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी काही वर्षांपूर्वी तब्बल २८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. या योजनेमुळे शहराला मुबलक आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, अशी मोठी घोषणा करण्यात आली होती. मात्र कोट्यवधींचा खर्च होऊनही वारंवार उद्भवणारी पाणीटंचाई नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करीत आहे.

दरम्यान, नगरपरिषदेतील काही नगरसेवक आणि नगरसेविका शिर्डी, शेगाव, पंढरपूर तसेच इतर धार्मिक स्थळांच्या दौऱ्यावर गेल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. धार्मिक श्रद्धेवर कोणाचाही आक्षेप नसला, तरी शहर गंभीर पाणीसंकटाशी झुंज देत असताना अशा दौऱ्यांची वेळ योग्य होती का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील चर्चांनाही उधाण आले आहे. काही नगरसेवकांच्या दौऱ्यांचा आणि घनकचरा विषयाशी संबंधित घडामोडींचा काही संबंध आहे का, याबाबतही शहरात कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

एकीकडे पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची चर्चा रंगत असल्याने जनतेत असंतोष वाढत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, शहरवासीयांना नियमित पाणी कधी मिळणार आणि लोकप्रतिनिधी जनतेसमोर नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे आता संपूर्ण मूलकरांचे लक्ष लागले आहे.

(पुढील भागात : घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयामागील नेमकी गोम काय? नगरसेवकांच्या दौऱ्यांमागे केवळ धार्मिक कारणे की आणखी काही?)

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!