ऑपरेशन यू टर्न’चा दणका; महामार्ग अपघातांत ३२ टक्क्यांची घट
चंद्रपूर महामार्ग पोलिसांच्या धडक मोहिमेचा परिणाम
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
शंकर बोरघरे ,९५२५६१२५५५
चंद्रपूर -महामार्गांवरील बेशिस्त वाहतूक, मद्यधुंद वाहनचालक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चंद्रपूर महामार्ग पोलिसांनी चालविलेल्या ‘ऑपरेशन यू टर्न’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, ब्लॅक स्पॉट सुधारणा आणि संयुक्त कारवाईमुळे नागपूर परिक्षेत्रातील महामार्ग अपघातांमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ३२ टक्क्यांची घट झाल्याची माहिती महामार्ग पोलिस विभागाने दिली.
महामार्ग पोलिस नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महामार्ग पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त कृती आराखड्यामुळे अपघात नियंत्रण मोहिमेला वेग आला आहे.
या मोहिमेत विनाहेल्मेट वाहनचालक, सीटबेल्ट न लावणारे चालक आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याने महामार्गांवर वाहतूक शिस्त वाढत असून अपघातांचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे.
अपघातप्रवण ठिकाणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ब्लॅक स्पॉट सुधारणा, रोड सेफ्टी ऑडिट, क्रॅश बॅरिअर्स, साईनेज आणि प्रकाशयोजना करण्यात येत आहे. त्यामुळे धोकादायक ठिकाणे अधिक सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विशेष म्हणजे, चंद्रपूर महामार्ग पोलिस केवळ दंडात्मक कारवाईवरच भर देत नसून नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीही करत आहेत. हेल्मेट, सीटबेल्ट आणि वाहतूक नियमांचे पालन हेच अपघात रोखण्याचे प्रभावी साधन असल्याचे पोलिसांकडून सातत्याने सांगितले जात आहे.
“अपघातमुक्त महामार्गांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले.
महामार्गावर अपघात झाल्यास नागरिकांनी तातडीने १०८ अॅम्ब्युलन्स सेवा, ११२ पोलिस हेल्पलाईन किंवा जवळच्या टोल नाक्यावरील मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महामार्ग पोलिस मदत केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
‘ऑपरेशन यू टर्न’मुळे चंद्रपूर महामार्ग पोलिसांनी अपघात नियंत्रण, जनजागृती आणि रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी बजावत अपघातमुक्त महामार्गांच्या दिशेने ठोस पाऊल टाकल्याचे स्पष्ट होत आहे.


