Saturday, July 4, 2026
Homeभद्रावतीवीजेच्या लपंडावाने भद्रावतीकर त्रस्त; नगराध्यक्ष प्रफुल चटकींचा महावितरणला इशारा

वीजेच्या लपंडावाने भद्रावतीकर त्रस्त; नगराध्यक्ष प्रफुल चटकींचा महावितरणला इशारा

भद्रावतीत वीजेच्या लपंडावावर नगराध्यक्ष प्रफुल चटकी आक्रमक; विद्युत विभागाला थेट जाब

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; १५ दिवसांत समस्या सोडविण्याचे महावितरणचे आश्वासन

भद्रावती , न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा तसेच रात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.

शनिवार (२७ जून) रोजी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष प्रफुल चटकी, नगरसेवक महेश जीवतोडे, राहुल  सोनटक्के तसेच माजी नगरसेवक राजुभाऊ सारंधर यांनी वरोरा विद्युत उपविभागाचे कार्यकारी अभियंता नवघरे आणि भद्रावती महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता चौरसिया यांची भेट घेतली.

यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली.

यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून, येत्या १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. दिलेल्या मुदतीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर नागरिकांच्या हितासाठी अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

महावितरणच्या आश्वासनानंतर आता भद्रावतीकरांचे लक्ष पुढील १५ दिवसांत होणाऱ्या प्रत्यक्ष कामांकडे लागले असून, शहरातील वीज समस्या खरोखरच मार्गी लागते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!