भद्रावतीत एसीबीचा दणका!
२० हजारांची लाच स्वीकारताना वनपाल, वनरक्षक व खासगी एजंट रंगेहात जाळ्यात
अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईचे कागदपत्र पाठविण्यासाठी मागितली होती लाच; एसीबीच्या सापळ्यात तिघेही अडकले
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे
मो. ९५२५६१२५५५
भद्रावती वनक्षेत्र सहायक कार्यालयातील भ्रष्टाचारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी जोरदार प्रहार करत वन विभागातील दोन अधिकारी आणि एका खासगी एजंटला रंगेहात पकडले. अवैध रेती वाहतुकीवर करण्यात आलेल्या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजारांची लाच मागून ती खासगी एजंटमार्फत स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत (वय ४२), वनरक्षक संदीप पुंडलिक पारवे (वय ३९), दोघेही वनक्षेत्र सहायक कार्यालय, भद्रावती तसेच त्यांच्या वतीने लाच स्वीकारणारा खासगी इसम ललित दिलीप नागपूरे (रा. भद्रावती) यांचा समावेश आहे.
ट्रॅक्टर जप्त… त्यानंतर सुरू झाली पैशांची मागणी
एसीबीच्या अधिकृत माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी तक्रारदार घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीने रेती वाहतूक करीत असताना रात्री सुमारे ११.४५ वाजता वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर अडवून वनक्षेत्र सहायक कार्यालयात आणला. त्यानंतर अवैध रेती वाहतुकीसंदर्भातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी आरोपींनी ₹२० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच न देता एसीबीकडे तक्रार
सरकारी अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर मागणीला बळी न पडता तक्रारदाराने २३ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची गोपनीय पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने पंचासमक्ष सापळा रचला.
एजंटमार्फत लाच स्वीकारताच एसीबीची झडप…..
२७ जुलै २०२६ रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपींनी खासगी इसम ललित दिलीप नागपूरे यांच्या मार्फत २० हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करून तिन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एसीबीच्या धडक कारवाईत या अधिकाऱ्यांचा सहभाग….
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चापोशी सतिश सिडाम आणि चापोशी संदीप कौरासे यांनी सापळा यशस्वी केला.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास लाच देऊ नका. त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
संपर्क :
टोल फ्री : १०६४
-
पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार : ९८२३२७०५८१
-
पोलीस निरीक्षक प्रशांत केदार : ८७८८७२३७६५


