दुःखावर डल्ला…? सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमच्या नावाखाली कथित वसुलीचा गंभीर आरोप
“मृत्यूच्या दुःखालाही पैशांचा भाव?” 2 ते 3 हजारांची मागणी होत असल्याचा आरोप; चौकशीची मागणी
चंद्रपूर न्यूज डेस्क, शंकर बोरघरे 95 25 61 25 55
सरकारी रुग्णालय म्हणजे सामान्य जनतेला संकटाच्या काळात आधार देणारी व्यवस्था. मात्र, जर त्याच ठिकाणी दुःखात बुडालेल्या कुटुंबीयांच्या अश्रूंनाही पैशांचा भाव लावला जात असेल, तर यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणती?
सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम (शवविच्छेदन) प्रक्रियेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांकडून 2 ते 3 हजारांची कथित वसुली केली जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. घरातील कर्ता पुरुष किंवा महिला यांचा अचानक मृत्यू अथवा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दुःखात कोसळलेल्या कुटुंबीयांना “पोस्टमार्टमसाठी साहित्य लागते, आधी पैसे द्या, त्यानंतरच पोस्टमार्टम होईल,” असे सांगितले जात असल्याची माहिती नागरिकांकडून पुढे येत आहे.
दुःखात असलेल्या कुटुंबीयांच्या विवशतेचा गैरफायदा?
मृत्यूचा धक्का सहन करत असतानाच अंत्यसंस्काराची घाई, नातेवाईकांची धावपळ आणि मानसिक तणाव यामुळे अनेक कुटुंबीय कोणताही वाद न घालता मागितलेली रक्कम देतात. काहींना उसनवारी करावी लागते, तर काहींना दागिने गहाण ठेवून पैसे उभे करावे लागतात, अशी माहिती पुढे येत आहे.
मोफत सेवा की पैशांचा व्यवहार?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, पोस्टमार्टमसाठी कोणते साहित्य लागते, त्याचा अधिकृत खर्च किती आहे, शासनाने शुल्क निश्चित केले आहे का, अथवा ही सेवा मोफत आहे का, याबाबत रुग्णालय परिसरात कोणतीही स्पष्ट माहिती किंवा अधिकृत फलक नसल्याचे सांगितले जात आहे.
जर पोस्टमार्टम सेवा मोफत असेल, तर पैशांची मागणी कोणाच्या आदेशाने केली जाते? जर शुल्क आकारले जात असेल, तर त्याची पावती आणि दरपत्रक कुठे आहे? साहित्याच्या नावाखाली घेतली जाणारी रक्कम नेमकी कोणाकडे जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता जनतेला हवी आहेत.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सरकारी कार्यालयांमध्ये ‘नागरिकांची सनद’ आणि मोफत सेवांचे फलक झळकतात; मात्र प्रत्यक्षात जर दुःखात बुडालेल्या गरिबांच्या अश्रूंवर आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. मृत्यू हा व्यापाराचा विषय नसून संवेदनांचा आहे. दुःखावर कमाई करणारी कोणतीही व्यवस्था समाजाला मान्य होणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे
या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
मृत्यूच्या दुःखालाही पैशांचा भाव लावणाऱ्यांना कायद्याची भीती दाखवण्याची वेळ आता आली आहे. सत्य काहीही असो, या प्रकरणाचा सखोल तपास होणे हीच जनतेची अपेक्षा आहे.


