जन्म-मृत्यू नोंदणीत प्रशासनाचा हलगर्जीपणा; नागरिकांना वर्षभर हेलपाटे
आरपीआय (आठवले)चा जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
चंद्रपूर, न्यूज डेस्क
Shankar Borghare 95 52 61 25 55
जन्म व मृत्यू नोंदणीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामातही प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा गंभीर आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांना धडक निवेदन देण्यात आले. महिला जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करूनही अनेक जन्म व मृत्यू नोंदणीची प्रकरणे सहा महिने ते वर्षभर प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
जन्म व मृत्यू दाखला हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून शिक्षण, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वारसा हक्क, मालमत्ता हस्तांतरण, बँक व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक असतानाही प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई ही गंभीर बाब असल्याचे आरपीआय (आठवले)ने स्पष्ट केले आहे.
पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी निश्चित करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
यावेळी हंसराज वनकर, ॲड. मुरलीधर आमटे, ॲड. शैलेंद्र देशकर, किरण घाटे, रमेश अंबादे, रीमा सिंह, बिंदुताई गडलिंग, शांती राजू रॉय, तृप्ती कुळमेथे, अंजली काटवले, कविता शेडमाके, मंगला थेरकर आणि सुप्रिया गिरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या हक्काशी संबंधित प्रकरणांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने देण्यात आला.


