Friday, July 31, 2026
Homeचंद्रपूर"रस्ता की मृत्यूचा सापळा?" दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या...

“रस्ता की मृत्यूचा सापळा?” दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

“रस्ता की मृत्यूचा सापळा?” दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

शेकडो विद्यार्थी रोज जीव मुठीत धरून करतात प्रवास; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेचा संताप, तातडीच्या कारवाईची मागणी

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

Shankar Borghare, 95 52 61 25 55

चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना मूलभूत सुविधांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील दाताळा परिसरात असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. अनेक पालक दुचाकीवर आपल्या लहान मुलांना घेऊन या रस्त्यावरून प्रवास करतात, तर शालेय बस, चारचाकी आणि इतर वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खोल खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे कोणता खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज चालकांना येत नाही. त्यामुळे दररोज अपघाताची भीती निर्माण होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात मात्र कोणतीही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता पगारे आणि विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता टांगले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनातील ठळक मागण्या

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची तात्काळ संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा.

रस्त्यावरील सर्व धोकादायक खड्डे सात दिवसांच्या आत बुजवून वाहतूक सुरक्षित करावी.

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.

भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण मार्गाचे दर्जेदार, मजबूत आणि टिकाऊ डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करावे.

यावेळी संतोष पारखी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर शिवसेना शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.”

निवेदन सादर करताना युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर तसेच शिवसेना चंद्रपूर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन उपस्थित होते.

अपघात झाल्यानंतर जाग येणार का?

शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेकडे जाणारा मुख्य रस्ता अशा अवस्थेत असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची असताना, केवळ कागदी प्रक्रिया आणि आश्वासनांवर वेळ घालवला जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. एखादा निष्पाप विद्यार्थी किंवा पालक अपघाताचा बळी पडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!