नेपाळमध्ये अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन
भोटे कोशी नदीच्या पुरामुळे नेपाळमध्ये अनेक पर्यटक अडकले; माहिती नोंदविण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच भारतातील अनेक पर्यटक व नागरिक तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी विशेष ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती नोंदविण्यासाठी लिंक :
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी माहिती द्यावी
चंद्रपूर जिल्ह्यातील कोणताही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकला असल्यास त्याच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन श्रीमती वसुमना पंत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी केले आहे.
अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती प्रशासनापर्यंत वेळेत पोहोचल्यास मदत व समन्वयाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता उपलब्ध माहितीनुसार ऑनलाइन नोंदणी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर


