सुरज लवाडिया, अंकुश मडावी, किशोर भुक्या, सुरज कोटनाके, वैभव बोडेकर, कल्याण पठाडे व अजित शेट्टी जुगारप्रकरणी ताब्यात; मांगली येथे पोलिसांची धाड
‘तीन पत्ती’ जुगारावर कारवाई; १ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती, न्यूज डेस्क , शंकर बोरघरे, 95 52 61 25 55
मांगली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगारावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, ५२ पत्ते आणि तीन वाहने असा एकूण १ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मांगली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली. यावेळी पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणारे सात जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सुरज राजू लवाडिया (वय ३४, रा. बंराज तांडा), अंकुश जंगलू मडावी (वय ३२, रा. मांगली), किशोर भगु भुक्या (वय ३४, रा. बंराज तांडा), सुरज रामदेव कोटनाके (वय ३५, रा. मांगली), वैभव मोहन बोडेकर (वय २७, रा. मांगली), कल्याण शंकर पठाडे (वय ५५, रा. मांगली) आणि अजित शंकर शेट्टी (वय २७, रा. किल्ला वार्ड, भद्रावती) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत तसेच जुगाराच्या ठिकाणाहून ८ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि ५२ पत्ते जप्त केले.
तसेच घटनास्थळावर असलेली हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (MH 34 CL 6462) किंमत ५० हजार रुपये, हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (MH 34 AQ 9612) किंमत ४० हजार रुपये आणि हिरो प्लेझर मोपेड (MH 34 CG 2534) किंमत ६० हजार रुपये अशी तीन वाहनेही जप्त करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, देवानंद डुकरे, गोपाल आतकूलवार, खुशाल कावळे आणि नितीन आमटे यांनी सहभाग घेतला.
सदर सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई भद्रावती पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.


