पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी वाहब अली सय्यद
प्रा. महेश पानसे यांच्या सूचनेनुसार नियुक्ती; आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी दिली माहिती
चंद्रपूर , न्यूज डेस्क
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा चंद्रपूरच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी वाहब अली सय्यद यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी प्रा. महेश पानसे सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी जिल्हा शाखेच्या आढावा बैठकीत दिली.
जिल्ह्यात पत्रकार संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, विविध तालुक्यांतील पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी संघटनेची बांधणी मजबूत करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वाहेब अली सय्यद यांच्यावर जिल्हा संघटकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हा संघटक म्हणून काम करताना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनेचा विस्तार करणे, पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय साधणे, पत्रकारांच्या अडचणी व प्रश्न संघटनेच्या माध्यमातून पुढे आणणे तसेच संघटनेचे विविध उपक्रम तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा शाखेच्या आढावा बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, तालुकास्तरावर संघटनेची कार्यकारिणी अधिक सक्रिय करणे, नवीन उपक्रम राबविणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर शासन-प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
“पत्रकारांची एकजूट आणि संघटनेची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व सदस्याने सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल,” असे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी सांगितले.
वाहेब अली सय्यद यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांनी स्वागत केले. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या जिल्ह्यातील कार्याला अधिक गती मिळेल आणि विविध तालुक्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करून पत्रकारांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शंकर बोरघरे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
जिल्हा शाखा चंद्रपूर


