मीथलेश चन्ने यांच्या हायवातून विनारॉयल्टी रेती; २० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अरुण मडावी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई, आता महसूल विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे
९५५२६१२५५५
विनारॉयल्टी रेती वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आणि २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल थेट जप्त झाला. मग प्रश्न सरळ आहे .रेती घाटातून बाहेर पडत असताना महसूल विभाग नेमका काय करीत होता?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरच्या रात्री सायवन फाट्याकडून ऊर्जा ग्रामच्या दिशेने जात असताना MH 34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी पाठलाग करून हायवा थांबविला. चालक अरुण तुकाराम मडावी (वय ५६) याची चौकशी केली असता हायवामध्ये विनारॉयल्टी रेती असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही ८ ब्रास रेती विठ्ठलवाडा समोरील पैनगंगा नदीघाटातून आणण्यात आली होती. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सदर रेती हायवा मालक मीथलेश चन्ने यांच्या सांगण्यावरून आणण्यात आली होती. या प्रकरणात मीथलेश चन्ने यांचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ६४ हजार रुपये किमतीची रेती आणि २० लाख रुपये किमतीचा हायवा, असा एकूण २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनात, API संजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई प्रेमकुमार बावनकर यांनी केली.
आता महसूल विभागाने उत्तर द्यावे!
रेतीचा उपसा कुठून झाला?
रॉयल्टी भरली होती का?
नदीघाटातून विनारॉयल्टी रेती बाहेर कशी पडली?
वाहतूक सुरू असताना महसूल विभागाची तपासणी कुठे होती?
हे प्रश्न आता केवळ कागदावर न राहता महसूल विभागाने प्रत्यक्ष कारवाईतून उत्तर देण्याची गरज आहे.
पोलिसांना रस्त्यावर हायवा दिसतो आणि कारवाई होते; मग नदीघाटावरून रेती निघताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ती दिसत नाही का? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पोलिसांनी कारवाई करून २० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, ही बाब स्पष्ट आहे. मात्र केवळ वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून प्रश्न संपत नाही. रेती कुठून उपसली, कोणी उपसली, रॉयल्टी कोणी भरली आणि विनारॉयल्टी रेती बाहेर पडण्यामागे कोणाची जबाबदारी आहे, याचाही महसूल विभागाने तपास करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया होत असताना महसूल विभागानेही कागदावरील पाहणी सोडून प्रत्यक्ष नदीघाटावर उतरून तपासणी आणि कारवाई करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी हायवा पकडला; आता महसूल विभाग रेतीचा मूळ स्रोत शोधणार का, हा खरा प्रश्न आहे.
पोलिसांची कारवाई झाली आहे; आता महसूल विभागाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


