चंदनखेडा कृषी कार्यालयाचा कारभार ‘रामभरोसे’?; ग्रामस्थांचा थेट कृषी विभागाला सवाल
कार्यालय नेहमी बंद, अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप; शेतकऱ्यांची धावपळ थांबविण्याची मागणी
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे, 95 52 61 25 55
तालुक्यातील चंदनखेडा येथील कृषी मंडळ कार्यालयाच्या कथित अनियमित कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आता थेट कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. कृषी कार्यालय नियमित सुरू नसणे, अधिकारी वेळेवर उपलब्ध न राहणे आणि संबंधित अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तालुका कृषी अधिकारी, भद्रावती यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारीत “नियमित कृषी कार्यालय चालू नसणे”, तसेच चंदनखेडा येथे ‘कृषी मंडळ कार्यालय’ नेमके कोणाकडे आहे, ते अर्जदारांना माहीत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय आहे, पण अधिकारी कुठे आहेत, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर केला असल्याने शेतकरी विविध सवलतींच्या कामासाठी कार्यालयात येत आहेत. मात्र कार्यालय बंद असल्याने त्यांना फेरा मारत परत जावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात अशी अपेक्षा असताना कार्यालयाच्या फेऱ्यांनीच शेतकऱ्यांचा घाम काढला जात असल्याची परिस्थिती असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
“शेतकरी कार्यालय शोधतोय की कार्यालय शेतकऱ्याला?”
चंदनखेडा हे भद्रावती तालुक्यातील मोठे गाव आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यालय अत्यंत महत्त्वाचे असताना ते नियमित सुरू नसल्याचा आरोप गंभीर आहे. शेतकरी कामासाठी कार्यालयात येतो, कार्यालय बंद मिळते; अधिकारी शोधायचा तर ते मुख्यालयी नाहीत मग शेतकऱ्याने शेती करायची की सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारायच्या? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तक्रारदार मनोहर शालिक हनवते व सिद्धलदीप चरणदास पेंदाम यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर, विभागीय कृषी आयुक्त नागपूर, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आणि कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडेही माहिती व योग्य कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
आता चौकशी कागदावर नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!
ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे कृषी मंडळ कार्यालय नियमित सुरू झाले पाहिजे, अधिकारी मुख्यालयी उपलब्ध राहिले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळाली पाहिजे.
कार्यालय बंद आणि अधिकारी गैरहजर अशी परिस्थिती तक्रारीतून समोर येत असेल, तर कृषी विभागाने याची प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे. आरोप खरे ठरल्यास जबाबदारांवर नियमानुसार कारवाईही झाली पाहिजे.
आता “कार्यालय कुठे आहे?” या प्रश्नापासून “अधिकारी कुठे आहेत?” या प्रश्नापर्यंत पोहोचलेल्या चंदनखेडा कृषी विभागाच्या कारभाराची वरिष्ठ अधिकारी कधी दखल घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


