Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीतहसीलसमोरच धोका; ‘आज-उद्या’ म्हणत कारवाई लांबणीवर?

तहसीलसमोरच धोका; ‘आज-उद्या’ म्हणत कारवाई लांबणीवर?

चंद्रपूर,  न्यूज डेस्क 

नागपूर, चंद्रपूर महामार्गावर भद्रावती तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेला स्ट्रीट लाईट पोल धोकादायक अवस्थेत वाकलेला असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात यापूर्वी प्रसारमाध्यमांतून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हालचाल नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलच्या तळभागातील नट-बोल्ट सैल झाल्याने संपूर्ण खांब एका बाजूला झुकलेला आहे. तळाशी असलेला विद्युत बॉक्स उघड्या अवस्थेत असून वायरिंग बाहेर दिसत आहे. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अत्यंत धोकादायक मानली जात आहे. कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता “आज येणार तर येणार, नाही तर उद्या बघून घेतो,” असे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारावरून प्रशासन गंभीर आहे की केवळ वेळकाढूपणा करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“यापूर्वीही माध्यमांतून प्रश्न मांडला. तरीही साधी पाहणीसुद्धा झाली नाही. नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही?” असा थेट प्रश्न उपस्थित करत तात्काळ दुरुस्तीची मागणी त्यांनी केली आहे. अपघात घडण्यापूर्वीच पोल सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने विलंब न करता ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


“दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का?” 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!