वरोरा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के एक्शन मोडवर!
अवैध रेतीसह गजानन पिंपळकर यांचा बोलेरो जप्त..!
भरदिवसा रेती चोरीचा पर्दाफाश; तहसील कार्यालयाच्या कारभारावर प्रश्न
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याची चर्चा सुरू असतानाच वरोरा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी स्वतः मैदानात उतरून मानोरा फाटा परिसरात धडक कारवाई करत बोलेरो पिकअपसह अवैध रेती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे भरदिवसा सुरू असलेल्या रेती वाहतुकीचा प्रकार उघड झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गजानन पिंपळकर यांच्या नावावर असलेल्या बोलेरो पिकअप वाहनातून सुमारे एक ब्रास रेती आढळून आली.
सदर वाहनाचा चालकासह ताब्यात घेऊन वाहन आणि रेती पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय, भद्रावती येथे जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जेना नाला परिसरात काही दिवसांपासून दिवसा ढवळ्या रेती वाहतूक सुरू असल्याची चर्चा होती. मजूर किंवा रोजंदारीवर असलेल्या व्यक्तीच्या नावावर वाहन ठेवून बाजारपेठेतून लहान वाहनांद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात होता.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वरोरा संदीप भस्के यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कारवाई केल्याने त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून रात्रीचे फिरते पथक कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रेतीची चोरी भरदिवसा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेकदा रात्रीच्या कारवाईचे, फिरत असल्याबद्दलचे फोटो प्रसारमाध्यमांना व्यक्तिगत व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात, मात्र दिवसा नदी-नाल्यांमधून रेती वाहतूक सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे फोटो पाठवून कारवाई दाखवली जाते की प्रत्यक्ष कारवाई होते? असा सवालही आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भद्रावती तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार सुरू असल्याच्या चर्चा वारंवार होत असताना तहसीलदार कार्यालयाकडून नेमकी काय कारवाई होते? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते उपविभागीय अधिकारी स्वतः मैदानात उतरून कारवाई करत असताना तालुका पातळीवरील प्रशासन मात्र कागदोपत्री कारवायांपुरतेच मर्यादित राहिले आहे का?
अशीही चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन अधिक सक्रिय होणार का? याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जेना नाला व परिसरात सुरू असलेल्या रेती वाहतुकीचा नेमका प्रकार काय, कोणत्या मार्गाने रेती बाहेर नेली जाते आणि यामागे नेमके कोण आहेत? याबाबत स्थानिकांकडून विविध माहिती पुढे येत असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील खुलासा लवकरच…


