Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीमनोज नंदीचे ट्रॅक्टर जप्त; कुणाडा परिसरातील पहाटेची कारवाई चर्चेत

मनोज नंदीचे ट्रॅक्टर जप्त; कुणाडा परिसरातील पहाटेची कारवाई चर्चेत

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा वाढत्या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर वर्ग त्रस्त झाला आहे. दिवसभर शेतात काम करून आलेल्या शेतकऱ्यांना रात्री सुखाची झोपही मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरची वर्दळ आणि रेती वाहतुकीचा आवाज परिसरात ऐकू येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

याच पार्श्वभूमीवर भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता मौजा कुणाडा परिसरात कारवाई करत रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त केले.

या कारवाईत मंडळ अधिकारी तथा गौण खनिज पथक प्रमुख अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुरकुटे, तसेच महसूल कर्मचारी खुशाल तुरारे, राहुल भोंगळे आणि बंडू वेलफुलवार सहभागी होते.

मिळालेल्या माहितीनुसार फुकट नगर, भद्रावती येथील मनोज नंदी यांचे ट्रॅक्टर विनापरवाना रेती भरून वाहतूक करताना आढळून आले. त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळी महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्रत्यक्ष व्यक्तिगत व्हॉट्सअ‍ॅपवर कारवाईची माहिती आणि फोटो पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली. या फोटोमध्ये कारवाईनंतर पथक उपस्थित असल्याचे दिसून येते. फोटोवर GPS Map Camera द्वारे भद्रावती, महाराष्ट्र येथील लोकेशन तसेच ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३३ वाजताची वेळ नोंद झालेली दिसत आहे. त्यामुळे या कारवाईची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान घाट परिसरातील उत्खननाची स्थिती, नदीपात्राची परिस्थिती आणि रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत या घाटांवरील उत्खनन थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर नाले खोदण्याबाबतही आदेश देण्यात आल्याचे समजते.

याचदरम्यान भद्रावती तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या मांगली (रै) नाल्यातूनही रात्रीच्या वेळी रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चारगाव परिसरातील वर्धा नदी आणि पारोधी परिसरातील ईरई नदी भागातही रेती वाहतुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मात्र या कारवाया सातत्याने सुरू राहणार का, तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार आणि पर्यावरणीय अटींचे पालन करूनच पुढील काळात रेती उत्खनन होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या या हालचालींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री दिसणाऱ्या ट्रॅक्टरच्या वर्दळीमागे नेमका प्रकार काय आहे, याबाबत स्थानिकांकडून विविध माहिती समोर येत आहे. स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा सविस्तर खुलासा पुढील भागात करण्यात येणार आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!