अन्न सुरक्षा योजनेला काळाबाजाराचे ग्रहण;
सिंदेवाही न्यूज डेस्क
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
तालुका सरचिटणीस
सचिन रामटेके ✍️
शासनाकडून अतिगरीब व गरजू कुटुंबांच्या अन्नसुरक्षेसाठी मोफत रेशन धान्य योजना राबविण्यात येत असली तरी सिंदेवाही तालुक्यात या योजनेलाच काळाबाजाराचे ग्रहण लागल्याची धक्कादायक चर्चा समोर येत आहे. तालुक्यात काही अपात्र लाभार्थी रेशन दुकानांतून धान्य उचलून ते दलालांना विकत असल्यामुळे खऱ्या गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ मिळण्याऐवजी त्यांच्या हक्काचे धान्य बाजारात जात असल्याची गंभीर बाब उघड होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दलाल गावोगावी फिरून लाभार्थ्यांकडून गहू व तांदूळ स्वस्त दरात खरेदी करतात. शासनाकडून मोफत मिळालेला हा धान्यसाठा दलालांकडे जमा होऊन पुढे खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात आला असून गरजू कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंत्योदय (AAY) आणि प्राधान्य गटातील काही अपात्र लाभार्थी या योजनेचा फायदा घेत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले काही लोकही रेशन धान्य उचलून ते दलालांना विकतात, तर खऱ्या अर्थाने गरजू असलेली कुटुंबे मात्र या यादीबाहेर राहिल्याने त्यांना शासनाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
रेशन धान्य वितरण प्रक्रियेतही काही त्रुटी असल्याचे बोलले जात आहे. शासकीय गोदामातून धान्य रेशन दुकानांपर्यंत अधिकृत वाहनांद्वारे पोहोचवले जाणे अपेक्षित असतानाही काही ठिकाणी खासगी वाहनांचा वापर होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी चांगल्या दर्जाचा तांदूळ बाजारात विकून निकृष्ट धान्य वितरणासाठी देण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांत उघडकीस आल्याने सिंदेवाही तालुक्यातही अशाच प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे गरीब कुटुंबांवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. रेशन धान्य मिळण्यात अडथळे येत असल्याने अनेक कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने गरीबांसाठी सुरू केलेली योजना प्रत्यक्षात दलाल आणि अपात्र लाभार्थ्यांच्या फायद्यासाठी वापरली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर सामाजिक संघटनांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदिवासी टायगर सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सिडाम यांनी प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले,
“सिंदेवाही तालुक्यात रेशनिंग धान्याचा काळाबाजार होत असून गरजू लाभार्थ्यांना मिळणारा माल अपात्र लाभार्थी उचलून दलालांना विकत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून संबंधित दलालांवर कठोर कारवाई करावी.”
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, रेशन व्यवस्थेची नियमित तपासणी करावी तसेच काळाबाजार करणाऱ्या दलालांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रभावी पावले उचलली नाहीत, तर शासनाची अन्न सुरक्षा योजना केवळ कागदावरच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


