मुल (प्रतिनिधी)
जुबेद शेख✍️
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या निकालात ओम सुनिल राखडे याने 91.67 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
याचबरोबर समृद्धी शिलवंत रामटेके (86.67%) हिने द्वितीय क्रमांक, तर उत्कर्ष सतीश काळे (85.83%) याने तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे मुल तालुक्याचे शैक्षणिक क्षेत्रात नाव पुन्हा एकदा झळकले आहे.
दरम्यान, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा उपक्रम भाजप मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
या प्रसंगी भाजप नेत्या सौ. किरण कापगते, महामंत्री डॉ. गुरु भंडारे, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. अश्विनी निकोडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे यांच्यासह बबन गुंडावार, युवराज चावरे, विवेक मांदाडे, सौ. लीना बद्देलवार, गौतम जीवने, सौ. मनीषा राखडे, सुनिल कुकुडकर, सौ. अपर्णा भेंडारे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तसेच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच प्रकारे गुणवंतांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


