Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीचारगाव घाटातून अवैध रेती वाहतूक; भिमराव ठेमके यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला

चारगाव घाटातून अवैध रेती वाहतूक; भिमराव ठेमके यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला

अवैध रेतीचा खेळ उघड! भिमराव ठेमके यांचा ट्रॅक्टर जप्त; चालक महेश ठेमके महसूलच्या कारवाईत सापडले

चारगाव घाटातून विना परवाना रेती वाहतूक; महसूल विभागाचा दणका, ट्रॅक्टर-ट्रॉली थेट तहसीलच्या ताब्यात

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यातील चारगाव रेती घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. या कारवाईत भिमराव गजानन ठेमके यांच्या मालकीचा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आला असून, वाहन चालक महेश ठेमके यांच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.

महसूल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारगाव रेती घाटातून काही दिवसांपासून विना परवाना रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल व ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के यांनी संयुक्त कारवाई केली.

कारवाईदरम्यान MH-34 AB 0450 क्रमांकाचा ट्रॅक्टर व MH-34 AB 9256 क्रमांकाची ट्रॉली रेतीने भरलेली आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता चालक महेश ठेमके यांच्याकडे रॉयल्टी पावती, वाहतूक परवाना किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करून तहसील कार्यालयाच्या ताब्यात दिली.

महसूल सूत्रांच्या माहितीनुसार, सदर वाहनाविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधितांकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. तसेच अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील विशेष मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

चारगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने दाखविलेल्या या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

विशेष

“महसूल विभागाचा सापळा अन् रेती तस्करांचा डाव फसला; भिमराव ठेमके यांचा ट्रॅक्टर जप्त, चालक महेश ठेमके कारवाईच्या कचाट्यात!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!