Sunday, July 5, 2026
Homeचंद्रपूरपोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या ‘ऑपरेशन यू-टर्न’चा प्रभाव; महामार्ग अपघातांत ३२ टक्क्यांची...

पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या ‘ऑपरेशन यू-टर्न’चा प्रभाव; महामार्ग अपघातांत ३२ टक्क्यांची घट

पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या ‘ऑपरेशन यू-टर्न’चा प्रभाव; महामार्ग अपघातांत ३२ टक्क्यांची घट

चंद्रपुरात संयुक्त नाकाबंदी मोहीम; मद्यधुंद चालक, ओव्हरस्पीडिंग आणि नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
शंकर बोरघरे , मो. ९५२५६१२५५५

महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, ब्लॅक स्पॉट सुधारणा आणि संयुक्त अंमलबजावणीमुळे नागपूर परिक्षेत्रातील महामार्ग अपघातांमध्ये मागील दोन वर्षांत तब्बल ३२ टक्क्यांची घट झाल्याची माहिती महामार्ग सुरक्षा पोलिसांनी दिली आहे.

महामार्ग सुरक्षा पोलीस, स्थानिक पोलीस आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश अपघातांचे प्रमाण आणखी कमी करणे हा आहे.

मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष कारवाई, हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जात आहे. परिणामी महामार्गांवरील वाहतूक शिस्त सुधारण्यास मदत होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून अपघातप्रवण ठिकाणांवरील ब्लॅक स्पॉट, सुरक्षा त्रुटी, साईनेज आणि प्रकाशयोजना यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. अपघातांची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे कामही सुरू आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच महामार्ग पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांचे निरीक्षण करून विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस संयुक्त नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत.

नागरिकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महामार्गावर अपघात झाल्यास तातडीच्या मदतीसाठी १०८ अॅम्ब्युलन्स सेवा, ११२ पोलीस हेल्पलाईन आणि १०३३ महामार्ग हेल्पलाईन वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेमुळे महामार्ग सुरक्षेला नवे बळ मिळाले असून अपघातमुक्त महामार्गांच्या दिशेने नागपूर परिक्षेत्राची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!