अडीच महिन्यांची प्रतीक्षा संपली; मूल शहरात आता ‘नो गॅस प्रॉब्लेम’
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्तक्षेपाने गॅस टंचाईचा प्रश्न मार्गी; मोतीलाल टहलियानी यांच्या पाठपुराव्याला यश
✍️ चंद्रपूर, न्यूज डेस्क ;
मूल, प्रतिनिधी
मूल शहरातील नागरिकांना गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून भेडसावत असलेल्या घरगुती गॅस टंचाईच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शहरातील हजारो ग्राहकांना दिलासा देणारा हा प्रश्न आमदार तथा माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्तक्षेपाने मार्गी लागला असून भाजपचे ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
सुमारे 35 हजार लोकसंख्या असलेल्या मूल शहराचा गॅस पुरवठा तालुक्याबाहेरील एजन्सीद्वारे होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक दिवस प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
शहरातील वाढत्या समस्येची दखल घेत भाजपचे ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी यांनी हा विषय गांभीर्याने घेत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. जनसामान्यांच्या अडचणीची तात्काळ दखल घेत सुधीरभाऊंनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिल्याची माहिती आहे.
त्यानंतर प्रशासकीय स्तरावर कार्यवाहीला वेग आला आणि मूल शहराचा गॅस पुरवठा संजय फ्लेम गॅस एजन्सीकडे सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे आता मूल शहरातील ग्राहकांना वेळेवर आणि सुरळीत गॅस पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गॅससाठी होणारी धावपळ, वितरणातील विलंब आणि ग्राहकांचा वाढता त्रास आता थांबणार असल्याने शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे, मूल शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे मोतीलाल टहलियानी यांनी यापूर्वीही रेल्वे एक्सप्रेसला मूल येथे थांबा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता गॅस टंचाईचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यांच्या जनहिताच्या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
मूलकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे निराकरण झाल्याने “आता मूल शहरात नो गॅस प्रॉब्लेम” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
— दैनिक लोकशाही


