‘मजा’चा धंदा पडला महाग; पोलिसांच्या धाडीत खर्रा विक्रेता गार!
FDA नंतर भद्रावती पोलीस ॲक्शन मोडमध्ये; खर्र्याचा ‘फ्लेवर’ उतरला, १३ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती,न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अलीकडेच केलेल्या धडक कारवाईनंतर आता भद्रावती पोलीसही अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यवसायाविरोधात पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरात अवैधरित्या सुगंधित ‘मजा’ तंबाखूपासून खर्रा तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, पहिल्याच कारवाईत एका अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिरामार्फत पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, प्रशिक हिरामन चहांदे (वय ३०, रा. शास्त्रीनगर, भद्रावती) हा आपल्या राहत्या घरी सुगंधित ‘मजा’ तंबाखूचा साठा करून त्यापासून खर्रा तयार करीत असून त्याची विक्रीही करीत आहे. माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचासमक्ष संबंधिताच्या घरावर धाड टाकली.
पोलीस सूत्रांनी अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, घरझडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १०८ कंपनीच्या लेबलचे ५० ग्रॅम वजनाचे ३५ सिलबंद सुगंधित ‘मजा’ तंबाखूचे डबे, अंदाजे १ किलो कातरलेली सुपारी, चुन्याची चुंगडी, सुपारी व सुगंधित तंबाखू घोटून तयार केलेल्या खर्रा (मावा)च्या ७० पुड्या तसेच खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले रबरी तुकडे असा एकूण १३ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रशिक हिरामन चहांदे व वैभव लांडे (रा. बेघर वस्ती, सुमठाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७४, २७५, २८६, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, FDA च्या कारवाईनंतर भद्रावती पोलिसांनीही अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील अवैध खर्रा विक्रेते व तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, अनेकांनी आपला अवैध व्यवसाय गुंडाळण्याची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलिस उपनिरीक्षक गजानन तुपकर, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, अनुप आष्टुनकर, पोलीस अंमलदार संतोष राठोड, योगेश घाटोळे, खुशाल कावळे आणि जितेंद्र पराते यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
रोखठोक…
“मजा” विकून पैसा कमावण्याच्या नादात अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकावे लागले. FDA नंतर पोलिसांचाही दणका बसल्याने शहरातील खर्रा विक्रेत्यांचा ‘फ्लेवर’ उतरला असून, आता अवैध धंदे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची धास्ती निर्माण होऊ लागल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.


