मांगली नाल्यातून रात्री अवैध ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक; महसूल प्रशासनाकडे कारवाईची मागणी
भद्रावती , न्यूज डेस्क
भद्रावती तालुक्यातील मांगली गाव परिसरातील नाल्यातून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मांगली नाला परिसरातून रात्रीच्या वेळी रेतीचा उपसा व वाहतूक होत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकाराची महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मांगली नाला परिसराची पाहणी करावी, तसेच रेती उत्खनन व वाहतुकीबाबत आवश्यक ती तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रूपेश मांढरे यांनी केली आहे.
रात्रीच्या वेळी होणाऱ्या रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष लक्ष देऊन आवश्यक ती तपासणी व गस्त वाढवावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सदर माहिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या तक्रारी व माहितीनुसार असून, रेती उत्खनन अथवा वाहतूक नियमबाह्य आहे की नाही, याबाबत अधिकृत तपासणी व महसूल प्रशासनाच्या कारवाईनंतरच स्पष्टता होणार आहे.


