चक्क ७० CCTV तपासले अन् दुचाकी चोरांचा नागपुरात शोध!
भद्रावती पोलिसांची धडक कारवाई; CCTVच्या आधारे दोन संशयितांचा शोध..
भद्रावती , न्यूज डेस्क,
शंकर बोरघरे,95 52 61 25 55
भद्रावती परिसरातून दोन मोटारसायकली चोरी करून पसार झालेल्या चोरांचा भद्रावती पोलिसांनी चांगलाच माग काढला. चोरांनी भद्रावती सोडून नागपूरचा रस्ता धरला; मात्र पोलिसांनी चक्क ७० CCTV फुटेज तपासत त्यांचा माग थेट नागपूरपर्यंत काढला.
भद्रावती पोलीस ठाण्यात अप.क्र. ९१४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील होंडा फॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH 34 AC 2410, अंदाजे किंमत १० हजार रुपये, ही ४ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती बसस्थानकाजवळून चोरीला गेली होती.
तसेच अप.क्र. ९७४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये दुसरा गुन्हा दाखल असून, यामध्ये यामाहा MT-15 क्रमांक MH 34 CW 2624, अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये, ही ५ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती-नागपूर रोडवरील डोली पेट्रोल पंप परिसरातून चोरीला गेली होती.
दोन्ही घटनांचा तपास सुरू करताना पोलिसांनी CCTV फुटेजचा आधार घेतला. एक-दोन नव्हे तर चक्क ७० CCTV फुटेज तपासण्यात आले. भद्रावतीपासून नागपूरपर्यंत प्रत्येक फुटेज बारकाईने तपासत पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढल्यानंतर पोलिसांनी नागपूर येथे पोहोचून त्यांची ओळख पटवली. या तपासात आशुतोष अतीराम यादव (वय १९), रा. सुनवारा, ता. धनोरा, जि. सिवनी (मध्य प्रदेश) आणि कमल मोहनदास (वय २०), रा. घणसोर, जि. जबलपूर (मध्य प्रदेश) यांचा शोध लावण्यात आला.
मोटारसायकल चोरी करून चोरांनी “आता पोलिसांना काय कळणार?” असा विचार केला असावा; मात्र CCTVने त्यांचा प्रवास टिपला होता. चोरांनी रस्ता बदलला, पण CCTVचा माग आणि पोलिसांचा तपास चुकवता आला नाही.
ही कारवाई प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांचे नेतृत्वात प्रशांत शेंदरे, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर , योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मोनाली गारघाटे यांच्या पथकाने केली.


