बंधाऱ्याच्या बिलासाठी ४० हजारांची लाच! कृषी सहाय्यक ACBच्या जाळ्यात
५५ हजारांची मागणी; ४० हजार स्वीकारताना रंगेहात पकडले
चंद्रपूर, न्यूज डेस्क शंकर बोरघरे 95 52 61 25 55
बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी थेट लाचेची मागणी! कोरपणा येथील कृषी सहाय्यक हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) वर्धा पथकाने मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी रंगेहात पकडले. शासकीय कामासाठी लाच मागितल्याच्या या कारवाईने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी उदगीरे यांनी सुरुवातीला ५५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. तक्रारीनंतर ACB पथकाने शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. मागणीची पुष्टी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या ८० नोटा, म्हणजेच ४० हजार रुपये स्वीकारताच ACB पथकाने उदगीरे यांना सायंकाळी ५.५५ वाजता रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल आणि ५९५ रुपये रोख रक्कम आढळली.
उदगीरे हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपणा येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा
पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे आणि पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे व विष्णू काळुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक केदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर करीत आहेत.
लाच मागितल्यास गप्प बसू नका!
शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


