(मूल तालुका प्रतिनिधी)-
✍️जुबेर शेख
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा मूल सावली तर्फे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे रुग्णांसाठी फळे वाटपाचा स्तुत्य व पुण्यशील उपक्रम राबविण्यात आला. याच वेळी नववर्ष २०२६ दिनदर्शिका प्रकाशनाचा सोहळाही थाटात पार पडला.
हा सोहळा नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके व डॉ. लाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मूल तालुका शाखा संघटक धर्मेंद्र सुत्रपवार यांनी या दोन्ही उपक्रमांची सविस्तर रूपरेषा मांडली.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ व नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत समर्थ यांचे स्वागत डॉ. बंडू रामटेके व डॉ. लाडे यांनी फुलगुच्छ देऊन केले. या प्रसंगी उपस्थित राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी संघाच्या लोकाभिमुख कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या मूल सावली शाखेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या उपयुक्त व आकर्षक अशा “दिनदर्शिका–२०२६” चे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये दाखल असलेल्या ५० हून अधिक रुग्णांना नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ, डॉ. बंडू रामटेके, प्रा. महेश पानसे, डॉ. लाडे, नगरसेवक प्रशांत समर्थ, डॉ. तिरथ उराडे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे, सामाजिक कार्यकर्ता दत्ताजी समर्थ तसेच तालुका शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
या सोहळ्याला राज्य पत्रकार संघाचे मूल सावली तालुका अध्यक्ष सतिश राजुरवार, सचिव राजेंद्र वाढई, उपाध्यक्ष रोहित कामडे, सावली तालुका उपाध्यक्ष रोशन बोरकर, प्रकाश चलाख, विवेक दुयौधन, राजेंद्र सुत्रपवार, सुशांत वाळके, सतीश सुंकरवार, जुबेद शेख यांच्यासह राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके व डॉ. लाडे यांनी रुग्णालयातील सेवा, सुविधा व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक व पत्रकार बांधवांना दिली. रुग्णसेवेसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून त्यांनी आभार मानले.——–‘
पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य व पुण्यशील नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ यांचे मत …………..
“नववर्षाचे स्वागत राज्य पत्रकार संघाच्या ,अशा स्तुत्य उपक्रमातून होत असल्याचे मत यावेळी नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ यांनी व्यक्त केले. राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्याचे पुण्यशील कार्य आपल्या हस्ते घडल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमात नेहमी सहभागी राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ यांनी रुग्णांची आस्थेने विचारपूस करून उपजिल्हा रुग्णालयातील निरंतर सुरू असलेल्या रुग्णसेवेचे मनापासून कौतुक केले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा म्हणून ही त्यांची पहिली भेट असल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हा स्तुत्य व पुण्यशील उपक्रम घडवून आणल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. एकता समर्थ व डॉ. रामटेके यांनी राज्य पत्रकार संघाचे विशेष कौतुक करून आभार मानले.


