Thursday, July 30, 2026
Homeभद्रावतीआरोग्य सेवा बळकट करा! करण संजय देवतळे यांची विधानसभेत मागणी..!

आरोग्य सेवा बळकट करा! करण संजय देवतळे यांची विधानसभेत मागणी..!

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

विधानसभेत आरोग्य विभागाच्या चर्चेत वरोरा भद्रावतीचे आमदार करण संजय देवतळे यांनी सरळ शब्दांत सांगितलं “आधी दवाखाने उभे करा, मग बाकी गोष्टी करा.” मतदारसंघातली खरी परिस्थिती त्यांनी तशीच्या तशी मांडली. कागदावर सगळं ठीक दिसतं, पण गावातल्या माणसाला काय मिळतंय, हा खरा सवाल त्यांनी केला.
येथील वरोरा भद्रावती भाग औद्योगिक. सिमेंट कारखाने, कोळसा खाणी, महामार्ग… अपघात तर नेहमीचं झालंय. ट्रामा केअर युनिटची इमारत उभी आहे, पण आत डॉक्टर नाहीत, स्टाफ नाही. अपघात झालेला माणूस दारात येतो, आणि मग त्याला पुढे चंद्रपूरला पाठवा असं सांगावं लागतं. “इमारत उभारून उपयोग काय, जर आत सेवा नाही?” असा थेट सवाल त्यांनी लावून धरला. पूर्णवेळ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ भरती करा आणि ट्रामा केअर लगेच सुरू करा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
दरम्यान शहरात स्वतंत्र अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर नाही. साध्या तापासाठी, इंजेक्शनसाठी लोकांना दुसऱ्या शहरात जावं लागतं. गरीब माणूस भाडं देणार की औषध घेणार? गावोगाव उपकेंद्रांची अवस्था बेताची. बोर्डा, जामगाव खुर्द, खेमजेई, आनंदवन भागात नवीन दवाखाने उघडा, औषधसाठा वाढवा, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली.
तसेच कंत्राटी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करतात, पण पगार तुटपुंजा. सफाई कामगारांचे वेतन वेळेवर मिळत नाही. “जे लोक सेवा देतात, त्यांनाच धावपळ का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रिक्त पदांमुळे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मिळत नाहीत, रुग्ण रांगेत थांबतो. ही अवस्था बदलली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
मात्र एमआरआय, सीटी स्कॅन मशीन नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचा दरवाजा ठोठवावा लागतो. खर्च वाढतो. गरीब कुटुंब कर्जात जातं. शासनाने ही यंत्रणा सरकारी रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय कुष्ठरोग आणि हत्तीरोगाने त्रस्त लोकांची परिस्थिती अजूनच कठीण. समाजात वाळीत टाकलं जातं, काम मिळत नाही. अशा लोकांसाठी आर्थिक मदत आणि पुनर्वसन योजना मजबूत करा, अशीही मागणी त्यांनी केली.
प्रसंगी देवतळे यांनी सभागृहात स्पष्ट केलं “आरोग्यावर तडजोड नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा.” आता शासन किती लवकर निर्णय घेतं आणि वरोरा.भद्रावतीत खरोखर बदल घडतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गावाकडचा माणूस एकच म्हणतोय बोलणं झालं, आता काम दिसलं पाहिजे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!