“पत्र निघालं… पण हायवा थांबलं नाही!” इम्रान खान..
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताची घटना घडूनही परिस्थितीत बदल न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“आदेश कागदावर आहेत, पण हायवा अजूनही रस्त्यावरच धावत आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान अफजल रफीक खान यांनी व्यक्त केली.
दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी गर्दीच्या वेळेत जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी करत तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात बाजारपेठ परिसरात जड वाहनांची ये-जा सुरूच असल्याचे चित्र आहे.
अपघातानंतरही स्थिती ‘जैसे थे’..!
आज संध्याकाळी जड वाहनांच्या वर्दळीत एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून एक इसम जखमी झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गर्दीच्या वेळेत हायवा व दहा चाकी वाहनांची सर्रास ये-जा सुरू असल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
प्रसंगी इम्रान खान यांनी प्रशासनाला काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
लेखी आदेशानंतरही अंमलबजावणी का दिसत नाही?
गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर नियंत्रण कुठे आहे?
मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का?
जर सोमवारपर्यंत जड वाहतूक बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच भविष्यात जीवितहानी झाल्यास संबंधित प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांची पण ठोस मागणी केली..!
सकाळ व सायंकाळी जड वाहनांना स्पष्ट प्रवेशबंदी, वाहतूक पोलिसांची सातत्याने तैनाती, पर्यायी मार्गांची तात्काळ अंमलबजावणी, भद्रावतीतील वाढती वर्दळ, अरुंद रस्ते आणि जड वाहनांची बेधडक ये, जा यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. प्रशासनाने केवळ पत्रव्यवहार न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी होत आहे.


