उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची कारवाई; तीन रेती घाटांवरील उत्खननाला तात्पुरता ब्रेक
चंद्रपूर, भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित घाटांवरील उत्खननाबाबत माहिती घेत त्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
या वेळी घाट परिसरातील परिस्थिती, उत्खननाची पद्धत, नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदार व कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसारच कामकाज करावे व पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबवावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर रस्त्यांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे अनधिकृत वाहनांची ये-जा नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, चारगाव परिसरातील वर्धा नदी तसेच पारोधी परिसरातील ईरई नदी भागात रेती वाहतुकीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा होत असल्याचे नागरिक सांगतात. याशिवाय ग्रामीण भागातील नदीलगत असलेल्या काही लहान नाल्यांमधूनही रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननावर आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. मात्र या बाबींना अधिकृत स्तरावर स्वतंत्र पुष्टी मिळालेली नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून विशेष भरारी पथक कार्यरत होते. या पथकाने विविध ठिकाणी तपासणी करून काही वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती आहे. मात्र सध्या अशा प्रकारच्या कारवाया पूर्वीइतक्या दिसून येत नसल्याची बाब स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील एका रेती घाटावर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची नोंद असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
रेती उत्खनन व वाहतूक शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार आणि पर्यावरणीय अटींचे पालन करूनच पुढील काळात करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाने दिल्याचे समजते.
(पुढील भागात , भद्रावती तालुक्यातील नदी व नाल्यांमधून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाचे नेमके चित्र, कोणत्या भागातून वाहतूक होते आणि प्रशासनाची पुढील कारवाई काय असणार याचा सविस्तर आढावा.)


