पोलीस म्हणतात नगरपालिकेचे काम, नगरपालिका म्हणते पत्र नाही; आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्न..!
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ आणि हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश तहसीलदार कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. मात्र आदेशानंतरही हायवा, दहा चाकी ट्रक आणि इतर जड वाहने पूर्वीसारखीच बाजारपेठेतून धावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आदेशाच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनातील विभागांमधील समन्वयावरही चर्चा सुरू झाली आहे.
भद्रावतीची मुख्य बाजारपेठ ही शहरातील सर्वाधिक वर्दळीची जागा मानली जाते. सकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांची आणि सायंकाळच्या वेळी महिला, दुकानदार तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ येथे असते. अशा ठिकाणी जड वाहनांची ये, जा सुरू राहिल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
तहसीलदार कार्यालयाने गर्दीच्या वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचा आदेश काढला. प्रशासनाच्या दृष्टीने हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र आदेश निघाल्यानंतरही मुख्य बाजारपेठेत जड वाहने सुरू असल्याचे दिसत असल्याने आदेश आणि अंमलबजावणी यामधील अंतर स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आदेश निघाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात रस्त्यावर त्याचा परिणाम दिसत नसल्याची स्थिती आहे.
विशेष म्हणजे तहसीलदार हे तालुक्याचे दंडाधिकारी (Executive Magistrate) म्हणून कार्य करतात. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आदेश जारी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यामुळे जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश काढल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या प्रकरणात भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान अफजल रफीक खान यांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा केली असता पोलिसांनी सांगितले की जड वाहतुकीची वेळ निश्चित करणे व त्याबाबत ठराव घेणे हे नगरपालिकेच्या अखत्यारीतील काम आहे.
तसेच पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी करता येऊ शकते, परंतु जड वाहनांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय नगरपरिषदेने निश्चित करणे आवश्यक असते.
दरम्यान, इम्रान खान यांनी नगरपरिषद कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जड वाहतुकीबाबत कोणतेही अधिकृत पत्र किंवा आदेश नगरपरिषदेला प्राप्त झालेले नाही.
त्यामुळे या आदेशाबाबत आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे पोलिस प्रशासन नगरपालिकेचा विषय असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे नगरपरिषदेला आदेशाची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.
या परिस्थितीत नागरिकांकडून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
तहसीलदारांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार?
प्रशासनातील विविध विभागांकडून वेगवेगळी माहिती मिळत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जड वाहतूक नियंत्रणाच्या प्रश्नावर प्रशासनातील स्पष्ट समन्वयाची गरज असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.
दरम्यान समोर आलेल्या छायाचित्रात भद्रावती नगर परिषद कार्यालयासमोरूनच तब्बल २२ चाकांचा डबल हाउजिंग ट्रेलर उभा दिसत आहे. जड वाहतूक बंदीचा आदेश असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातून एवढे मोठे वाहन सहजपणे जात असल्याचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“आदेश कागदावर निघतो,
पण रस्त्यावर ट्रेलरही थांबलेच दिसते ,,,स्थानिक नागरिकांकडून चर्चेत..
इम्रान अफजल रफीक खान यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितले…!
“नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
अत्यंत महत्त्वाचा आहे.
आदेश काढल्यानंतर त्याची
प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे
आवश्यक आहे. संबंधित
विभागांनी समन्वय साधून
तातडीने निर्णय घ्यावा.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की भद्रावतीकरांच्या सुरक्षेसाठी हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नसून जनतेच्या जीवनाशी संबंधित आहे.
“जोपर्यंत मुख्य बाजारपेठे
जड वाहतूक नियंत्रणात येत
नाही, तोपर्यंत
भद्रावतीकरांच्या सुरक्षेसाठी
आमचा लढा सुरूच राहील,”
असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या भद्रावतीकरांच्या मनात एकच प्रश्न घुमत आहे
आदेश कागदावर आहे… पण जड वाहतूक प्रत्यक्षात रस्त्यावरील कधी थांबणार?


