लोकसभेतील वक्तव्य ठरले वादाचे केंद्र; “हा महिलांचा अपमान, सामाजिक न्यायाला धक्का” आमदार देवतळे
वरोरा/चंद्रपूर (प्रतिनिधी) चंद्रपूर. आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत महिलांच्या आरक्षणाबाबत केलेल्या “महिलांना आरक्षणाची गरज नाही” या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी ठाम, धाडसी आणि स्पष्ट भूमिका घेत संबंधित विधानाचा जोरदार समाचार घेतला आहे.
प्रसंगी आ. देवतळे यांनी अत्यंत ठाम शब्दांत म्हटले की, “हे विधान केवळ दुर्दैवी नाही, तर महिलांच्या हक्कांवर थेट घाला घालणारे आहे. एका महिला खासदाराकडूनच असे विधान होणे म्हणजे महिलांच्या सन्मानावरच प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढा देण्याऐवजी अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे त्यांच्या संघर्षाचा अपमान आहे.”
महिलांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहत आम..देवतळे यांनी स्पष्ट केले की, आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असली तरी राजकारणात त्यांना अपेक्षित प्रमाणात संधी व प्रतिनिधित्व अद्याप मिळालेले नाही. “महिलांना समान संधी नाकारून सशक्तीकरणाच्या केवळ घोषणा करून उपयोग नाही. प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.
भारतीय जनता पक्ष महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत देवतळे म्हणाले की, “महिलांना सत्ताकेंद्रात योग्य स्थान मिळाल्याशिवाय खरे सशक्तीकरण शक्य नाही. महिला आरक्षण हा केवळ राजकीय मुद्दा नसून सामाजिक न्याय, समानता आणि अधिकार यांचा पाया आहे.”
आ.देवतळे यांनी पुढे ठाम भूमिका मांडत म्हटले, “देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा सक्रिय आणि निर्णायक सहभाग अनिवार्य आहे. आरक्षण ही महिलांना न्याय देणारी आणि त्यांना पुढे आणणारी प्रभावी व्यवस्था आहे. त्यामुळे महिलांना समान हक्क देणे हीच खरी लोकशाही आहे.”
“महिलांचा अपमान करणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांना धक्का देणाऱ्या अशा विधानांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. महिलांच्या हक्कांसाठी आमची लढाई कायम राहील,” असा स्पष्ट इशारा देत देवतळे यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली.
दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विधानामुळे चंद्रपूर, आर्णी मतदारसंघात महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये यावरून जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आ. देवतळे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, त्यांच्या या भूमिकेला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.


