Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरनाश्ता-जेवण चमचमीत… किचनमध्ये घाणीचे साम्राज्य! अन्न व औषध प्रशासन ‘झोपेत’; नागरिकांच्या आरोग्याशी...

नाश्ता-जेवण चमचमीत… किचनमध्ये घाणीचे साम्राज्य! अन्न व औषध प्रशासन ‘झोपेत’; नागरिकांच्या आरोग्याशी सुरू उघड खेळ..

नाश्ता-जेवण चमचमीत… किचनमध्ये घाणीचे साम्राज्य!
अन्न व औषध प्रशासन ‘झोपेत’; नागरिकांच्या आरोग्याशी सुरू उघड खेळ..

चंद्रपूर, न्यूज डेस्क

सिंदेवाही / लोनवाही (प्रतिनिधी ✍️नंदकुमार गंडाटे)

सिंदेवाही, लोनवाही शहरात हॉटेल आणि नाश्ता सेंटरमध्ये ग्राहकांना बाहेरून आकर्षक, चटकदार आणि चमचमीत पदार्थ दिले जात असले, तरी किचनमध्ये मात्र अस्वच्छतेचा कळस गाठलेला दिसतो. ग्राहकांनी एकदा तरी किचनमध्ये डोकावून पाहिल्यास त्या हॉटेलमध्ये पुन्हा पाऊल ठेवावेसे वाटणार नाही, अशी भयावह परिस्थिती उघडकीस येत आहे.

हॉटेल व्यवसायात स्वच्छता ही केवळ औपचारिकता नसून ती मूलभूत गरज आहे. मात्र येथे अनेक हॉटेल चालकांनी नियम धाब्यावर बसवले असून किचनमध्ये घाण, अस्वच्छ भांडी, दूषित पाणी आणि अयोग्य साठवणूक यामुळे अन्नाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे तळणासाठी वापरले जाणारे तेल दिवसन्‌दिवस, आठवडाभर पुन्हा पुन्हा वापरले जात असल्याचे चित्र आहे. अशा तेलात तयार होणारे पदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर कठोर लक्ष ठेवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र या विभागाचा संपूर्ण कारभार ‘कानाडोळ्या’तून सुरू असल्याचे दिसते. नियमांनुसार ताजे पदार्थ, पॅकिंगचे तेल, स्वच्छ किचन आणि योग्य साठवणूक बंधनकारक असतानाही त्याचे पालन होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

तपासणीच नाही, कारवाई दूरच!
जिल्हास्तरीय कारभार चंद्रपूर येथून पाहिला जातो. वर्षातून क्वचितच एखाद्या वेळी पथक येते, तेही केवळ औपचारिक फेरफटका मारल्यासारखे. परिणामी, हॉटेल चालकांमध्ये कोणतीही भीती उरलेली नाही. नियमांचे उल्लंघन करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ‘रान मोकळे’ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागरिकांचा रोष; आरोग्याशी खेळ थांबवा!
हॉटेल व नाश्ता सेंटरमध्ये होत असलेल्या या गंभीर दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “चमचमीत पदार्थांच्या आड घाणीचे साम्राज्य लपवून आरोग्याशी खेळ सुरू आहे,” असा संतप्त सूर उमटत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ व्यापक तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, ही बेफिकीरी थेट लोकांच्या आरोग्यावर बेतणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!