Wednesday, July 29, 2026
Homeभद्रावतीहिरव्या नेटखाली रेतीचा काळाबाजार? जेना घाट, कोंडा नाला परिसरातून दिवसाढवळ्या वाहतूक;...

हिरव्या नेटखाली रेतीचा काळाबाजार? जेना घाट, कोंडा नाला परिसरातून दिवसाढवळ्या वाहतूक; हायवा, बोलेरो, ट्रॅक्टरची साखळी चर्चेत

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यातील बंद घोषित जेना घाट व कोंडा नाला परिसरातून सुरू असलेल्या संशयित अवैध रेती तस्करीचा प्रकार आता अधिक संघटित स्वरूपात समोर येत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळत आहे. पिकअप, बोलेरो, ट्रॅक्टर तसेच हायवा वाहनांमधून हिरव्या रंगाचे नेट झाकून रेतीची वाहतूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे ही वाहतूक केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून डागा कंपनीचा परिसरातून अरविंदो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही संशयित वाहनांची वर्दळ वाढल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. भर दिवसा शहरातील विविध बांधकाम ठिकाणी रेती पोहोचवली जात असल्याचाही दावा स्थानिक करत आहेत.

मुख्य रस्त्यांवरूनच धाडसी वाहतूक?

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच नव्हे तर दिवसा देखील मुख्य मार्गांचा वापर करून रेतीची वाहतूक केली जात आहे. वाहनांवर हिरवी नेट टाकून कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. काही वाहनांवर नंबर प्लेट अस्पष्ट असल्याच्याही चर्चा आहेत.

स्थानिकांच्या मते, हिरव्या नेटमुळे प्रथमदर्शनी सामान्य मालवाहतूक असल्याचा भास निर्माण होतो. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर रेतीची ने-आण होत असल्याचा आरोप केला जात आहे.

“नजर” ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक?

स्थानिकांकडून आणखी एक धक्कादायक दावा करण्यात येत आहे. काही रस्त्यांवर बलदंड युवकांना रोजंदारीवर ठेवण्यात आल्याची चर्चा असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या वाहनांवर लक्ष ठेवणे, माहिती पुढे पोहोचवणे आणि वाहनांना सतर्क करणे, अशी जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

यासाठी प्रतिदिन सुमारे एक हजार रुपयांपर्यंत मजुरी दिली जात असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे.

शहरातील बांधकामांमध्ये संशयित रेतीचा वापर?

तालुक्यात सुरू असलेल्या काही खासगी व शासकीय बांधकामांमध्ये संशयित रेतीचा वापर होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी रेतीचे साठे उतरवले जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित विभागांची तपासणी नेमकी कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाई होते की फक्त बैठका?

अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाकडून बैठका घेतल्या जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात रेती वाहतूक सुरूच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कारवाईच्या घोषणा होतात, पण वाहनं मात्र रोज त्याच रस्त्यावरून धावताना दिसतात,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांचा थेट सवाल

बंद घाटातून रेती बाहेर कशी येते?

हायवा, बोलेरो आणि ट्रॅक्टरची तपासणी का होत नाही?

मुख्य रस्त्यांवरून सुरू असलेला हा प्रकार प्रशासनाच्या नजरेआड कसा?

वाहनांवर हिरवी नेट टाकण्यामागे नेमका उद्देश काय?

तस्करांना कोणाचे संरक्षण मिळते?

असे अनेक सवाल आता उघडपणे विचारले जात आहेत.

पुढील भागात…

जेना घाट, कोंडा नाला परिसरातून संशयित रेती वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने, संभाव्य मार्ग, आणि या संपूर्ण साखळीतील आणखी धक्कादायक माहितीचा पुढील भाग लवकरच…

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!