“बस थांबत नाही, विद्यार्थ्यांनी काय उडत कॉलेजला जायचं का?” भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांचा प्रशासनाला सज्जड इशारा
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
मो. 95 25 61 25 55
चंद्रपूर शहरातील जनता कॉलेजसमोरील बसथांबा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः नामशेष झाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून भरधाव वाहनांमध्ये बस पकडत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. मात्र परिवहन विभाग आणि संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
टी.सी. पाण्याच्या टाकीजवळ अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला बसथांबा आता केवळ नावापुरता उरला आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना, रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध उभे राहून बस थांबवावी लागत आहे. अनेक एसटी व खासगी बसचालक थांबा न घेता थेट पुढे निघून जात असल्याने गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रश्नावर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“एसटी आणि खासगी बसचालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काहीही पर्वा उरलेली नाही. बसच थांबत नसेल तर विद्यार्थ्यांनी कॉलेजला कसं जायचं? सरकार विद्यार्थ्यांना उडण्यासाठी पंख देणार आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “जनता कॉलेज परिसर हा हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र प्रशासन डोळेझाक करून बसले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ भाजयुमो कदापि खपवून घेणार नाही.”
इम्रान खान यांच्या प्रमुख मागण्या
जनता कॉलेजसमोरील बसथांबा तात्काळ, अधिकृतरित्या सुरू करावा,
सर्व एसटी व खासगी बसांना थांबा बंधनकारक करावा,
थांबा न घेणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करावी,
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष पाहणी पथक नेमावे,
सकाळ व सायंकाळ अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात,
“हा आमचा अंतिम इशारा आहे. पुढील ४८ तासांत निर्णय न घेतल्यास चंद्रपूर आगारासमोर विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा सज्जड दमही इम्रान खान यांनी प्रशासनाला दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत “विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे की बसचा वेग?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, शासन शिक्षणासाठी मोठमोठ्या योजना जाहीर करत असले तरी विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका आता उघडपणे होऊ लागली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांनी चंद्रपूर आगाराचे व्यवस्थापक (डी.एम.) यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, “सदर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,” असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजयुमो अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत असून, जनता कॉलेजसमोरील बसथांबा प्रश्न आता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
“विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? बसथांबा गायब, प्रशासन गायब आणि विद्यार्थ्यांचे जीव मात्र रोज टांगणीला…! पुढील भागात होणार मोठा खुलासा.”


