सिंदेवाही-लोनवाहीत अवैध धंद्यांचा बोलबाला; कारवाईचा पत्ता नाही!
सिंदेवाहीत देशी दारूचा “फुल्ल स्टॉक”; प्रशासनाचा नेटवर्क मात्र “नो सिग्नल”!
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
✍️ ॲड, देवानंद गंडाटे
सिंदेवाही व लोनवाही परिसरात अवैध देशी दारू विक्री इतकी बिनधास्त सुरू आहे की, आता नागरिकांना किराणा दुकान, नाश्ता सेंटर आणि चौकांमध्ये “चहा घ्या की पेग?” असा पर्याय मिळतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिद्धार्थ चौक, बाजार चौक आणि रेल्वे स्टेशन परिसरात देशी दारू विक्रीचा धंदा इतका ओपन झाल्याची चर्चा आहे की, आता फक्त बोर्ड लावायचा बाकी असल्याचे नागरिक मिश्किलपणे बोलताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, वडा-समोसा खाताना “सोबत काही स्पेशल पाहिजे का?” अशी ऑफर मिळत असल्याची चर्चा रंगत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे संबंधित प्रशासनाने बहुधा “डोळे बंद करून शांत बसा” ही नवीन योजना लागू केली असावी, अशी उपरोधिक टीका होत आहे.
कारवाईचेही भन्नाट चित्र पाहायला मिळते. एखाद्या दिवशी अचानक धाड टाकली जाते, दोन फोटो काढले जातात, कागदांवर सही होते आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा “जैसे थे” परिस्थिती! त्यामुळे नागरिक आता विचारू लागले आहेत की, ही कारवाई असते की फोटोशूट?
परिसरातील युवक व्यसनाच्या आहारी जात असताना संबंधित यंत्रणा मात्र “आम्हाला काहीच दिसत नाही” मोडमध्ये असल्याची चर्चा आहे. बिट अंमलदारांनी बहुधा परिसर पाहण्यासाठी दुर्बीण उलटी धरली असावी, असा टोला नागरिक लगावत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने “झोपेतून उठून” प्रत्यक्ष मैदानात उतरावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा सिंदेवाहीत लवकरच “देशी दारू पर्यटन” सुरू होईल की काय, अशी हास्यास्पद पण तितकीच गंभीर चर्चा आता रंगू लागली आहे.


