सिंदेवाही-लोनवाहीत अवैध दारू विक्रीचे नवे फंडे; दिवसा शांतता, रात्री पुन्हा “ऑनलाइन सेवा” सुरू?
वृत्तप्रसारानंतर शटर डाउन; पण संध्याकाळ होताच “स्पेशल ग्राहकांसाठी” गुप्त सेवा सुरू असल्याची चर्चा
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी ✍️ ॲड. देवानंद गंडाटे
सिंदेवाही व लोनवाही परिसरातील अवैध देशी दारू विक्रीबाबत प्रसारमाध्यमांतून सातत्याने वृत्तप्रसार होताच संबंधितांनी आता धंद्याची “नवीन टेक्निक” सुरू केल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. दिवसा दुकानांवर शांतता, शटर बंद आणि चेहऱ्यावर निरागस भाव… पण संध्याकाळ होताच “ओळखीवाल्यांसाठी सेवा उपलब्ध” असल्याचे बोलले जात आहे.
सिद्धार्थ चौक, बाजार चौक आणि रेल्वे स्टेशन परिसरात काही ठिकाणी दिवसा एवढी शांतता दिसते की जणू काही परिसरात संत-महंतांचा सत्संग सुरू आहे की काय, अशी भावना निर्माण होते. मात्र रात्रीच्या वेळी काही ठिकाणी अचानक हालचाली वाढत असल्याने नागरिकही आता मिश्किल प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी “दुकान बंद आहे” असा बोर्ड लावून मागच्या दरवाजातून व्यवहार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. ग्राहकांनाही आता थेट दुकानात न बोलावता “फोन करा… माल पोहोच होईल!” अशी सुविधा मिळत असल्याचे नागरिक हसत-हसत सांगत आहेत.
दरम्यान, कारवाईचे चित्रही भन्नाट असल्याची चर्चा आहे. एखाद्या दिवशी अचानक धाड, दोन-चार फोटो, थोडी धावपळ आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा “सगळं सुरळीत” सुरू! त्यामुळे नागरिक आता विचारू लागले आहेत की, ही कारवाई असते की “रिहर्सल”?
युवक व्यसनाच्या आहारी जात असताना संबंधित यंत्रणा मात्र बहुधा “आम्हाला काही दिसत नाही” मोडमध्ये असल्याचा टोला नागरिक लगावत आहेत. काहींनी तर “दिवसा बंद, रात्री ओपन” या प्रकाराला आता सिंदेवाहीतील नवीन “शिफ्ट सिस्टम” असे नाव दिले आहे.
“दिवसा शटर डाउन… रात्री होम डिलिव्हरी?”
“कारवाईचा धाक की फक्त फोटोसेशन?”
अशा उपरोधिक चर्चांनी आता सिंदेवाही परिसर चांगलाच रंगू लागला आहे.


