भद्रावतीच्या श्रद्धास्थानाला विकासाची नवी दिशा; आमदार करण देवतळे यांचे पुढाकार
२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील प्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण व विकासकामांचा शुभारंभ सोमवार, दि. 18 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार करण देवतळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामांमुळे परिसराला आकर्षक आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी सांगितले की, भद्रावती शहराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मंदिर परिसराचा विकास अत्यंत आवश्यक आहे. भवानी माता मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देणे, हा या विकासकामामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विकासकामांतर्गत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सी.सी. रोड बांधकाम, भव्य कमान गेट उभारणी तसेच विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शुभारंभ सोहळ्यास भवानी माता मंदिर समितीचे अध्यक्ष ईश्वर गौरकार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, संजय वासेकर, कुलते साहेब, अमित गुंडावार, नगरसेविका सौ. वृषाली पांढरे, इम्रान खान, किशोर गोवारदिपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, मंदिर समिती सदस्य, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
“जय भवानी माता”च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.


